Breaking News

वाईत शेतक-यांची घोषणाबाजी, अहिंसक मार्गाने आंदोलन

सातारा, दि. 05 - वाई-पाचवड रोडवर व्याजवाडी येथे पंचक्रोशी ग्रामस्थांनी अहिंसक मार्गाने आंदोलन केले. आत्महत्याग्रस्त शेतक-यांना श्रद्धांजली अर्पण  करण्यात आली. शेतक-यांच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा्यात आला. शेकडो शेतकरी यावेळी रस्त्यावर जमा झाले होते. हातात फलक घेवून त्यांनी घोषणा देत विविध  मागण्या केल्या.
शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळावा, शेतक-यांची कर्जमाफी व्हावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतक-यांना पेन्शन योजना लागू करावी,  शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, आदी मागण्या करत शेतकरी एकता झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. वाई बाजार समितीत काही तुरळक माल शेतक-यांनी  आणला होता. कोकणातून काही व्यापारी आले होते. मात्र, भाजीपाला न मिळाल्याने वाहने मोकळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते बाजार समिती  आवारात आले होते.
मात्र, पोलिस बंदोबस्तामुळे शेतक-यांनी आणलेला शेतीमाल विकता आला. शेतक-यांना शेतात पिकवलेल्या नाशवंत मालाचे नुकसान होवू नये म्हणून काहींनी हा  माल किरकोळ बाजारात आणून विकला. त्यामुळे आज भाजी मंडईत शेतीमालाची काही प्रमाणात आवक झाली होती. कांदा, बटाटा मार्केट पूर्णत: ठप्प झाला होता.  शेतक-यांनी पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात नेहमीच्या ग्राहकांना दुधाची विक्री केली. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे नुकसान होवू नये म्हणून टोमॅटोही  मोठ्या प्रमाणात किरकोळ बाजारात विक्रीस आली होती. बाजार समिती, कडेगावसह अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.