Breaking News

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई, दि. 24 - दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे. यापूर्वीच या प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट  बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ठाणे क्राईम ब्रांचनं अखेर आज ममताला फरार घोषित केलं आहे. याची नोटीस पोलिसांनी ममताच्या  यारी रोडवरील घरावर चिटकवली आहे. ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तरीही ममता कुलकर्णी हजर  राहिली नाही तर तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते आणि तिच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते. दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता  कुलकर्णीसह विकी गोस्वामीही फरार आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी  गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात  आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून  2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर  स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला.  या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.