Breaking News

स्मार्ट शहरांच्या यादीत आणखी 30 शहरांचा समावेश

नवी दिल्ली, दि. 24 - केंद्र सरकारने स्मार्ट शहरांच्या यादीत आणखी 30 शहरांचा समावेश केला आहे . आतापर्यंत या यादीत एकूण 90 शहरांची नावे जाहीर  करण्यात आली आहेत. या निवडीने आतापर्यंत महाराष्ट्रातील 11 शहरांचा स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश झाला आहे.
येथील विज्ञान भवनात आयोजित शहरी परिवर्तन या राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ही यादी जाहीर केली. या यादीत केरळमधील  त्रिवेंद्रम हे प्रथम क्रमांकावर, तर महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड 18 व्या स्थानावर आहे. स्मार्ट शहरांच्या योजनेंतर्गत आणखी 40 शहरांचा समावेश केला जाणार होता.  त्यासाठी 45 शहरांचे प्रस्ताव प्राप्त झाले. मात्र केवळ 30 शहरांची नावे अंतिम करण्यात आली, असेही नायडू यांनी सांगितले.
निवड झालेल्या 30 शहरांना विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज बनविण्यासाठी या योजनेंतर्गत 57 हजार 393 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. आतापर्यंत  देशातील 90 शहरांची निवड करण्यात आली. या शहरांच्या विकासासाठी एकूण 1 लाख 91 हजार 155 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. उर्वरीत 10 स्मार्ट  शहरांच्या निवडीच्या स्पर्धेत देशातील 20 शहरांमध्ये स्पर्धा असणार आहे, असे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
या यादीत महाराष्ट्र 1, केरळ 1, छत्तीसगढ 2, गुजरात 3, जम्मू-काश्मीर 2, आंध्र प्रदेश 1, मध्य प्रदेश 2, बिहार 1, पुदुच्चेरी 1, हरियाणा 1, अरुणाचल प्रदेश 1,  तामिळनाडू 4, उत्तराखंड 1, उत्तर प्रदेश 3, सिक्कीम 1, मिझोराम 1, तेलंगणा 1, कर्नाटक 1, हिमाचल प्रदेश 1 यांचा समावेश आहे.