Breaking News

रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल

नवी दिल्ली, दि. 23 -  भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रचंड शक्तीप्रदर्शनाद्वारे भाजपकडून त्यांचा  अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजू शेट्टींसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
मात्र यावेळी प्रकर्शाने जाणवणारी बाब म्हणजे शिवसेनेची अनुपस्थिती होय. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र  शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हतं. कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर  शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत.