Breaking News

नवोदयच्या दोन विद्यार्थ्यांनी जुळवून आणला मसूरमध्ये योगदिनाचा ‘योग’

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : दोन शालेय विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन कराड तालुक्यातील मसूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा अपूर्व ’योग’ जुळवून आणला. योगाचे महत्व समजून घेऊन त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने या चिमुकल्यांनी ही धडपड केली. त्यांच्या या धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाल्यापासून हिंदुस्थानी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या योगाला जागतिक महत्व प्राप्त झाले आहे. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग आवश्यक असल्याने त्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून विविध संस्था, संघटना पुढे आल्या आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मसूर येथील हर्षल गजानन चेणगे व प्रणव सूर्यकांत बाजारे या दोन शालेय विद्यार्थ्यांनी योगाचा भव्य कार्यक्रम करण्याचा संकल्प केला होता.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून त्यांनी घरोघरी जावून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जागृती केली. त्याचे फलित म्हणून उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले. हे दोघेहीजण खावली (सातारा) येथे केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयात चांगल्या गुणांनी सातवी उत्तीर्ण होऊन आठवीत गेले आहेत.