वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे : जिल्हाधिकारी डॉ.पुलकुंडवार
सामाजिक न्याय दिन कार्यक्रम साजरा; विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार
बुलडाणा, दि. 27 - राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाची मुहूर्तवेढ रोवली. शिक्षणामध्ये दिनदलित, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देवून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. अशा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यशैलीवर राज्याचा सामाजिक न्याय विभाग काम करीत आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामध्ये अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या आहेत. या योजनांच्या लाभामुळे अनेकांचे आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. तसेच जीवनमानही उंचावले आहे. समाजातील शोषीत, पिडीत, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकताच सामाजिक न्याय दिन कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, चैनसुख संचेती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, अशांत वानखडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, समाजाला दिशा देण्यासाठी शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य समाजासाठी महत्वाचे होते. राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वप्रथम पाटबंधारे धोरण आणले. त्यांनी सामाजिक विषमता दूर करून वंचित घटकाला विकासाच्या मुख प्रवाहात आणले. त्यामुळे त्यांच्या कार्याची अजूनही आठवण होते. प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले.
याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक न्याय दिन कार्यक्रम हा लोकोत्सव होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच आमदार चैनसुख संचेती यांनी समाजात विषमता घालवायची असेल, तर शिक्षणाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. ज्यामुळे विषमता दूर होवून समता स्थापन होते. प्रत्येकाने आपण समाजाचे काही देय लागत असल्याबद्दल वंचित, दुर्बल घटकाला मदत करण्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात रविकांत तुपकर म्हणाले, राज्यामध्ये पुरोगामित्व हा जगण्याचा आधार आहे. त्यामुळे या पुरेागामी राज्यात दलित - सवर्ण भेदभाव, दलितांवर होणारे अत्याचार ही दुर्दैवाची बाब आहे. सामाजिक न्याय जर प्रस्थापित करायचे असेल, तर जाती-पातीत रूंजलेल्या समाजाला बाहेर काढणे गरजेचे आहे. तरच राज्यात खर्या अर्थाने सामाजिक न्याय स्थापन होईल. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाहीर डी. आर इंगळे यांच्या चमूने स्वागत गीत सादर केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागातंर्गत कार्यरत विविध महामंडळे, योजनांचे लाभार्थी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त विद्यार्थी यांना धनादेश व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात अन्य मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, शाहीर, समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचलन खरात यांनी, तर आभार प्रदर्शन सतिष बाहेकर यांनी केले.
