Breaking News

मध्यावधी झाल्याच तर मैदान सोडणार नाही : अमित शाह

मुंबई, दि. 18 - महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. अमित शाह हे मुंबई दौर्‍यावर असून पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट  केली. निवडणुका झाल्याच तर भाजपच जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता आम्ही आमची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोण किती  सीट लढणार हे नंतर, पण प्रत्येक सीटवर ताकद वाढवणार, असंही शाहांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशा वेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा  शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलिकडेच मध्यावधी  निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. त्या पार्श्‍वभूमीवर अमित शहांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.