Breaking News

धर्मनिरपेक्ष भारतात जात काही जाईना...!

दि. 22, जून - जगाच्या पाठीवर सर्वात समजूतदार लोकशाही नांदविणारा भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. जेव्हढ्या समजूतदारपणे भारत देशात धर्माचे राजकारण  निषिध्द आहे तितक्याच समजूतदारपणे धर्माच्या बुरख्याखाली दडलेली जात मात्र प्राधान्याने विचारात घेतली जाते. राष्ट्रपती सारखे प्रथम दर्जाचे गुणवंत सर्वोच्च पदही  या जातीवंत व्यवस्थेने बहिष्कृत केले नाही, हीच आपल्या लोकशाहीची प्रतिष्ठा म्हणावी का?...
भारताचे राष्ट्रपती कोण होणार? याविषयी गेल्या काही दिवसापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांसोबत माध्यमांच्या वर्तुळातही खल सुरू होता. हे सर्वोच्च पद  राजकारणाला अपवाद असते अशी समजूत अगदी कालपरवा पर्यंत रूढ असल्याने अस्सल राजकारणी आणि मतदार यांच्याव्यतिरिक्त या निवडणूकीत विशेष रस  दाखविणारे क्षेत्र फारच थोडे. तथापि यंदा प्रथमच या सर्वोच्य पदाची निवडणूक मध्यावधी सार्वत्रिक निवडणूकीपेक्षाही चर्चेचा विषय बनली आहे. कार्पोरेट जगतासह  सामान्य माणूसही जो सार्वजनिक निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावेलच याची खाञी देता येत नाही तो देखिल राष्रपती पदाची निवडणूक आणि निवडणूक  लढविणार्‍या उमेदवारांवर चर्चा करतांना दिसतो आहे.
यावेळी दिसत असलेला बदल लोकशाही प्रगल्भतेच्या पातळीवर स्वागतार्ह वाटत असला तरी हा बदल होण्यामागचे वास्तव तितकेच भयानक आहे, हे लक्षात  घेतल्यानंतर आपल्या लोकशाहीचा प्रवास कुठल्या दिशेने चालला आहे याचे मंथन आवश्यक बाब ठरते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विचाराअंती या देशाच्या  तत्कालीन कारभार्‍यांनी भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे जाहीर केले. या देशात सर्व धर्माचे लोक राहु शकतात हे धोरण स्वीकारले.
स्वतंत्र भारताच्या या भुमिकेचे जगभर अपेक्षित स्वागतही झाले.अर्थात भारताच्या धर्मनिरपेक्ष भुमिकेमागे ब्रिटीश राज्यकर्त्यांची दबावाप्रेरीत प्रेरणा नव्हती असे म्हणणे  धाडसाचे तर ठरेलच शिवाय एका नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणही मिळेल.
भारताने धर्मनिरपेक्ष वाद स्वीकारल्यानंतर स्वतंञ भारताचा कारभार स्वदेशी कारभार्यांच्या हाती आला. कारभारांवर सातत्याने प्रभाव रहावा म्हणून धर्मनिरपेक्षवाद  हत्यार म्हणून वापरण्याची प्रथा रूढ  झाली.तो प्रभाव मोडून काढण्यासाठी धर्मवाद्यांनीही कंबर कसली. या दोघांनीही आपला अजेंडा रेटतांना फक्त सत्तेचा विचार  केला. धर्मवादी असोत नाही तर धर्मनिरपेक्षवादी या दोघांनीही केवळ सत्तेचे समिकरण सोडविण्याचे सुत्र सांगणारे मतांचे राजकारण केले. धर्माचे लांगूलचालन करून  मतांसाठी व्होट बँकेचा अनुनय करण्यात ही डळी समान पातळीवर कार्यरत होती आणि आहे.त्याचा परिणाम धर्म आणि धर्माचा बुरखा पांघरलेल्या विविध जाती यांचा  अनुनय सर्व पातळीवर सुरू झाला. गल्लीपासून दिल्लीपासून ग्रामपंचायत पासून पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक निवडणूक जातीच्या आधारावर जिंकण्याचे षडयंञ राबविले  गेले.त्याचा परिणाम हा देश आणि या देशाची लोकशाही भोगते आहे.
लोकशाहीची ही दशा एका बाजूला भारत मातेला अस्वस्थ करीत असली तरी एक आशेचा किरण अजूनही भारत मातेला दिलासा देत होता. सारे राजकारण  जातीपातीच्या भोवर्यात फिरत असतांना या देशाचे प्रथम नागरीक माञ या गलिच्छ प्रक्रियेतून आजपर्यंत अलिप्त होते.तथापि याक्षणापासून तो आशेचा किरणही  मावळतीकडे झुकतांना दिसतो आहे. हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.जातीवंत धर्मनिरपेक्षवाद या देशाला कुठे घेऊन जाणार हाच खरा कळीचा मुद्दा आहे.