Breaking News

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी बीज भांडवल कर्ज योजना : स. ता. जाधव

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाची बीज  भांडवल कर्ज योजना खुल्या प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी राबविली जाते. या योजनेचा जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक स. ता. जाधव यांनी केले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना  स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई यांच्यामार्फत बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते.  या योजनेत महामंडळाकडून 35 टक्के रक्कम 4 टक्के व्याज दराने देण्यात येते. 5 टक्के रक्कम उमेदवाराचा सहभाग व 60 टक्के रक्कम  बँकेकडून बँकेच्या  व्याज  दराप्रमाणे देण्यात येते. कर्जफेडीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, वय किमान 18 व  कमाल 45 असावे. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नची कमाल मर्यादा 6 लाखापर्यंत असावी. अर्जदाराच्या कुटूंबातील व्यक्ती थकबाकीदार नसावी. अधिक  माहितीसाठी उमेदवारांनी माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजेता मार्गदर्शक केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला एसटी स्टँड जवळ सातारा  येथे संपर्क साधावा.