Breaking News

नकोत नुसत्या वल्गना, शेतकर्‍याला तारेल केवळ डॉ.विखेंच्या जनसेवेची कल्पना

दि. 05, जून - राज्यातील शेतकरी भिकेला लागला असतांना सरकार अडेलतट्टू भुमिका घेत आहे. त्याचवेळी या वातावरणाचा फायदा घेऊन काही मंडळी  शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आपले राजकीय आसन स्थिर करू पहात आहेत. राजकारण करणे गुन्हा नसेलही, पण निसर्गाची अवकृपा, बाजारबसव्या  दलालांची चांडाळ निती, सरकारचा उदासीन नाकर्तेपणा बळीराजाला आयुष्य संपविण्यास प्रवृत्त करीत आहे. या हतबल झालेल्या, चालती बोलती लाश बनलेल्या  शेतकर्‍याच्या दुखर्‍या अन् ठिसुळ खांद्यावर बंदुक ठेवून आपली पोळी भाजण्याचा पापी खटाटोप काही नतद्रष्ट करीत आहेत. या दलालांना चारीमुंड्या चीत करून  सरकारच्याही डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची काळाची गरज ओळखणारा नेताच खरा बळीचा कैवारी असू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील विखे कुटूंबाने  आपली हिच परंपरा कायम ठेवून अशा हतबल शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प सोडला आहे.
स्वातंत्र्यपुर्व काळा पेक्षाही स्वातंत्र्योत्तर काळात शेतकर्‍याची अवस्था बिकटच नव्हे तर शोचनिय झाली आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात अनेक कारभारी आले आणि  गेले. कुणाही राज्यकर्त्याने शेतकर्‍याच्या क्लेशदायक जखमांवर तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय कायमस्वरूपी उपचार केले नाहीत. परिणामी शेतकर्‍याची जखम  चिघळत गेली. आज या जखमेचं गँगरीन झाल्याचे दिसते आहे.
शेतकर्‍याला वेळोवेळी भासणार्‍या अडचणीचे भांडवल करून अनेक कथित शेतकरी नेते जन्माला आले. समकालीन सरकारशी भांडून सरकार दरबारी आपले निश्‍चित  स्थान निर्माण करून सत्तेचा भोग घेऊन तृप्तही झाले.शेतकर्‍यांचे प्रश्‍न मात्र आहेत तसेच राहीले. उलट कालानुरूप त्यात भरच पडली. आज महाराष्ट्रभर शेतकर्‍यांचा  असंतोष ऊफाळून आलेली दिसतो आहे तो असंतोष या  शेतकर्‍यांच्या फितूर पुढार्‍यांच्या कर्माची देण आहे.
आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्‍यासोबत राहणे वावगं नाही. पण केवळ राजकीय उद्देश सफल करून घेण्यासाठी शेतकर्‍याच्या परिस्थितीचा फायदा  घेण्याऐवजी ज्या शेतकर्‍याच्या जीवावर कमावलं त्या शेतकर्‍यासाठी ठोस कार्यक्रम देणे ही राजकीय नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे, ही नैतिकता महाराष्ट्रातील मोजके  राजकीय कुटुंब जपतांना दिसतात.विशेषतः अहमदनगर जिल्ह्याचे हेच वैशिष्ट्य आहे. समाजकारण असो की राजकारण व्यक्तीगत फायद्या तोट्याचा विचार करीत  असतानाही सामुहीक हिताला प्राधान्य देण्याची परपंरा आजही कायम आहे याची आठवण पद्मश्री विखे पाटील यांच्या चौथ्या पिढीच्या योगदानाने करून दिली आहे,
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे कर्तृत्व अवघा आशिया खंड जाणतो. त्यांचाच वारसा चालविणारे पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचेही शेतकरी समाजासाठी  योगदान आहे हे महाराष्ट्र नाकारत नाही. तिसर्‍या पिढीचे राधाकृष्ण विखे पाटील यामंना आजोबा आणि पित्याचा वारसा लाभला आहे. त्या मार्गावर वाटचाल करीत  असतांना सभागृहात आणि सभागृहात देखील मिळेल त्या आयुधांचा वापर करून त्यांनी समाजहित साधण्याचा प्रयत्न केला आहे
याच कुटुंबातील चौथ्या पिढीचे नेतृत्व करणारे डॉ. सुजय विखे आपले पणजोबा, आजोबा आणि पित्याच्या कर्तृत्वाची जाण ठेऊन आहेत. आपल्या तीन पिढ्यांनी पार  पाडलेल्या जबाबदारीचा वारसा चालवायचा म्हणजे साधे सोपे काम नाही. या जबाबदारीला सामाजिक प्रतिष्ठेचे वलय तर आहेच, शिवाय या जबाबदारीवर असलेला  विश्‍वासही तेव्हढाच अढळ आहे. हे ओळखून डॉ.सुजय विखे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचे निव्वळ भांडवल म्हणून वापर करीत सरकारच्या नावाचा शंख फुंकण्याऐवजी  आपल्या राजकीय, सामाजिक, आणि आर्थिक कुवतीचा वापर परिस्थितीने मारलेल्या शेतकर्‍याचे उध्वस्त कुटुंब पुन्हा सावरण्यासाठी करण्याचा संकल्प सोडला आहे.  डॉ.सुजय विखे यांची नेमकी इच्छा काय आहे हे महाराष्ट्राने समजून घेणे या घडीची गरज आहे. डॉ.सुजय विखे यांच्यासारखी शेकडो राजकीय कुटुंब या महाराष्ट्रात  आहेत, त्या सर्वांनी डॉ.विखे यांचा हा कित्ता गिरविण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचा शेतकरी सरकारच्या दारात कटोरी घेऊन कधीच उभा राहणार नाही. मात्र  त्यासाठी हवी आहे डॉ. विखे यांच्यासारखी प्रामाणिक इच्छाशक्ती...