Breaking News

’वनयुक्त शिवार’साठी शास्त्रशुद्ध नियोजन करा - सुधीर मुनगंटीवार

नाशिक, दि. 03 - ’वनयुक्त शिवार’ करण्यासाठी शासनाने यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून वृक्षरोपणासाठी शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे  आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासनातर्फे 1 ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी  वनविभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त महेश झगडे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ग्रामपंचायतींना वृक्षरोपणाचा लाभ व्हावा, यासाठी 156 प्रकारच्या प्रजातींची माहिती त्यांना देण्यात आली आहे आणि रोपेदेखील उपलब्ध करून  देण्यात आली आहे. आतापर्यंत 3 कोटी 18 लक्ष वृक्ष लागवडीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी  वसुंधरा रक्षणाचे कार्य म्हणून या उपक्रमाकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची भावना जनतेच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वृक्ष तोडणार्‍या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हात  वाढवायचे आहेत. मानवी अस्तित्वासाठी वसुंधरेचे शोषण थांबविण्याची अत्यंत गरज असून त्यासाठी वृक्षवेड्या नागरिकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. वनाकडे  केवळ पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने न पहाता रोजगार आणि उत्पन्नाचे साधन म्हणून देखील पहावयास हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वनविभागाने 448 पुस्तिकांच्या माध्यमातून वनाचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. 80 प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून वनसंवर्धन आणि संरक्षण  करण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नात नागरिक आणि सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे आणि कल्पकतेने उपक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
’फॉरेस्ट’ या शब्दातच फुड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी, सॉईल आणि टिक असे जीवनाशी संबधीत सर्व घटक समाविष्ट असल्याने पर्यावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर वनाचे  महत्व ओळखण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त कले. पुढील वर्षी 1 जुलैपर्यंत हरितसेनेच्या माध्यामातून वृक्षारोपणात सहभाग घेणार्‍या एक कोटी  स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
खारगे म्हणाले, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आवश्यक आहे. राज्यात हे प्रमाण 20 टक्के आहे. पर्यावरण संतुलनासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक  असून सर्व घटकांना यात सहभागी करून घेतल्यास ते शक्य होईल. म्हणूनच शासनाने या कामाला जनआंदोलनाचे स्वरूप देवून 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड  करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी 2 कोटीचे उद्दीष्ट असतांना 2 कोटी 82 लक्ष वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे चांगली वातवरण निर्मिती झाल्याने  यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अधिक वृक्षलागवडीसाठी ‘लँन्ड बँक’ तयार करण्याचा विविध यंत्रणांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त झगडे म्हणाले, गतवर्षी विभागात उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्ष लावण्यात आले आहेत. यावर्षीदेखील अशाच प्रकारची कामगिरी सर्व विभाग करतील, असा  विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. वृक्षाच्या उपयुक्त प्रकारांची लागवड, वृक्षारोपणाचा पर्यावरणावर होणार्‍या बदलांचा अभ्यास आणि नागरिकांसाठी हा प्राधान्याचा उपक्रम  व्हावा यासाठी प्रयत्न अशा विविध स्तरावर या उपक्रमाचा विचार करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
रोपे लागवडीसाठी एकूण 16 हजार 41 स्थळे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने 94 लक्ष खड्डे खोदून तयार आहेत व उर्वरित खड्डे खोदण्याचे काम प्रगती  पथावर आहे.