Breaking News

कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती कर्नान यांना बेड्या

कोईम्बतूर, दि. 21 - कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती सीएस कर्नान यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी तामिळनाडूच्या कोईम्बतूरमधून त्यांना बेड्या  ठोकण्यात आला, त्यानंतर त्यांची रवानगी चेन्नईला करण्यात आली. कोईम्बतूरजवळ मदुकराईमधील एका अपार्टमेंटमध्ये कर्नान राहत असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर कोईम्बतूर पोलिसांच्या मदतीने पश्‍चिम बंगाल पोलिसांनी कर्नान यांना बेड्या ठोकल्या. कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कर्नान यांना सहा महिन्यांचा  तुरुंगवास ठोठावला होता. त्यानंतर म्हणजे 9 मे पासून ते परागंदा झाले होते.
कर्नान यांनी सरन्यायाधीशांसह त्यांच्या 6 सहकारी न्यायमूर्तींना थेट 5 वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने कर्नान यांचे निर्णय  रद्द ठरवत, कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कर्नान यांनाच 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. इतकंच नाही तर तातडीने त्यांची रवानगी जेलमध्ये करण्याचे आदेशही  कोर्टाने दिले. कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला तुरुंगवास ठोठावण्याची ही पहिलीच घटना आहे.