Breaking News

नायजेरीयन चिमुकल्याच्या मेंदुवर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे, दि. 04 - सह्याद्री हॉस्पिटल तर्फे नुकतीच मेंदूचा कर्करोग असलेल्या सोमटोचुकवू अनायो या 3 वर्षांच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही  शस्त्रक्रिया 27 एप्रिल 2017 रोजी झाली. सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि भारतातील अग्रगण्य न्युरोसर्जन डॉ. चारुदत्त आपटे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या  टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
सोमटोचुकवू हा नायजेरियन असून त्याला 26 एप्रिल 2017 रोजी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या अर्ध्या मेंदूमध्ये घन स्वरुपातील  सिस्टिक लेशन असल्यामुळे त्याला पॉलीसिस्टिक अ‍ॅस्टियोसिटोमाचा त्रास होत होता. सोमटोचुकवूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यासोबत उलट्या  होणे, अशक्तपणा आणि चालताना अडखळणे असा त्रास होत होता. विविध चाचण्या आणि मेंदूचे स्कॅनिंग केल्यानंतर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी  सांगितले. ओळखीपाळखीच्या माध्यमातून या कुटुंबाला सह्याद्री हॉस्पिटल्सच्या न्यूरोसर्जरी विभागाची माहिती मिळाली होती.
सोमटोचुकवूची आई इफियोमा अनायो ही आपल्या मुलाला बरे होताना पाहून आनंदाने भारावून गेली होती. ती म्हणाली, मी अत्यंत आनंदी आहे. सोमटोचुकवूच्या  आजारामुळे तो 4 वर्षांचा होईल का नाही यात पण शंका होती. पण आज हा चमत्कार डॉ.चारुदत्त आपटे आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले आहे. येथे केवळ माझ्या  बाळालाच नव्हे, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन जीवन मिळाले आहे. सह्याद्री टीमचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत, असे मत तिने यावेळी व्यक्त  केले.