Breaking News

उपमहापौरांच्या निवडीसंदर्भात शहर रिपाइंची बैठक

पुणे, दि. 04 - उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदी कोणाची निवड करायची यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत शहर  रिपाइंची बैठक होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी दिली. त्यामुळे उपमहापौरपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत येत्या आठवड्यात अंतिम  निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपाइंचे पाच नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर पालिकेचे उपमहापौरपद रिपाइंकडे देण्यात आले होते.  त्यानुसार रिपाइंचे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नवनाथ कांबळे यांच्याकडे उपमहापौरपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, उपमहापौरपदी विराजमान  झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदी कोणाची निवड  करायची यासंदर्भात पक्षात चर्चा सुरू आहे. या पदासाठी रिपाइंमधून ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच नगरसेविका  सुनीता वाडेकर यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.
यासंदर्भात शहर रिपाइं नेत्यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी शहरस्तरावर बैठक  घेऊन निर्णय घेण्याची सूचना केली. त्यानुसार, शहर रिपाइंची येत्या दोन-तीन दिवसांत बैठक होणार असून, त्यामध्ये उपमहापौरपदी कोणाची निवड करायची  याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.