जिल्हा बँकेच्या घेरडी शाखेत कोट्यवधींचा घोटाळा उघड
सोलापूर, दि. 04 - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घेरडी शाखेतून तत्कालीन शाखाधिकारी, तीन लिपिक एक शिपाई यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बँकेचे कामकाज ठप्प आहे. ठेवीदार खातेदार यांच्या तक्रारी घेण्याचे काम सुरू आहे. निश्चित किती रुपयांचा अपहार झाला याची शहानिशा करण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. 31 मे रोजी शाखाधिकारी ए. एन. उतरे हे सेवानिवृत झाले. त्यांंच्या जागी जून रोजी एम. एन. राऊत यांची नेमणूक झाली. खातेदार आल्यानंतर पासबुकवरील आणि प्रत्यक्ष बँकेच्या संगणकावरील रकमांच्या नोंदी यात तफावत आढळली. तक्रारी वाढल्याने त्यांच्याकडून लेखी तक्रारी घेतल्या जात आहेत. सर्व तक्रारीनंतर निश्चितच किती रकमेचा घोटाळा झाला, हे समजणार असल्याचे शाखाधिकारी राऊत यांनी सांगितले. हा प्रकार उघड झाल्यानंतर सेवानिवृत्त शाखाधिकारी उतरे, लिपिक मिलिंद कुलकर्णी, बी.एस. आलदर, लेखापाल एस.एम. घुणे, शिपाई सुभाष करे या पाचजणांनी संगनमताने खातेदारांच्या ठेवी बचत खात्यावरील रकमांचे अपहरण केले आहे. हे सर्वजण कुटुंबासह गायब आहेत. यातील बहुतांशी सेवक घेरडी गावचेच आहेत. ते कामावरही आल्याने दुसर्या शाखेतील कर्मचार्यांच्या मदतीने कामकाज केले जात असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
