Breaking News

वृक्ष लागवडीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे

औरंगाबाद, दि. 04 - मराठवाड्यातील वनक्षेत्र हे 4.82 टक्के असून तो 33 टक्के वर येण्यासाठी वृक्षलागवड या कार्यक्रमाला मोहिम म्हणून न पाहता सकारात्मक  दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. तसेच या मोहिमेत लोकप्रतिनिधीनी आत्मीयतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वित्त आणि नियोजन, वनेमंत्री श्री. सुधीर  मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीमध्ये वृक्ष लागवडीच्या मोहिमेसंदर्भातील आढावा बैठक श्री. सुधीर मुनगंटीवार  यांच्या अध्यक्षेखाली झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, वन विभागाचे  सचिव विकास खारगे, आमदार सर्वश्री प्रशांत बंब, इम्तयाज जलील, सुभाष झांबड, महापौर भगवान घडामोडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मुख्य वन  संरक्षक प्रकाश महाजन, औरंगाबाद महसूल विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले की, जनसामान्यांचा वृक्ष लागवडीतील प्रत्यक्ष सहभाग हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट आहे. कोणतीही योजना यशस्वी होण्यामध्ये तिच्या  अंमलबजावणीमध्ये लोकसहभाग अत्यंत आवश्यक ठरतो. वृक्ष लागवडीचे महत्व सांगून त्यामधील पर्यावरण संवर्धनाची भूमिका लोकांना समजविण्यासाठी वन  विभागामार्फत अनेक जनजागृतीचे कार्यक्रम सुरु आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नागरिकांना वृक्षलागवडी करीता प्रोत्साहित करण्याकरीता रोपे सुलभतेने  प्राप्त होण्याच्या उदेशने वन विभागाकडून 25 जून ते 5 जुलै 2017 या कालावधीत दोन टप्पामध्ये रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक  जिल्ह्यात महानगरपलिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायती यापैकी कोणत्याही तीन ठिकाणांची निवड करुन शहराच्या व्याप्तीनुसार तीन ते पाच ठिकाणी वन  विभागकडून रोपे पुरविण्याकरीता वन महोत्सव केंद्र उघडण्यात येतील. या योजनेमध्ये सवलतीच्या दरामध्ये रोपे उपलब्ध होतील असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की,  वन विभाग व इतर सर्व शासकीय यंत्रणामार्फत सर्वांना 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत पार पडणा-या वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन  करण्यात येत आहे. पुढील पिढीला जगण्याकरीता शुध्द वातावरण राखण्यासाठी हे पाऊल अत्यावश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी औरंगाबाद, लातूर, जालना येथील वन संरक्षण विभागाच्यावतीने वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्धेची माहिती पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले.  यावेळी वृक्ष लागवड कार्यक्रम, खडे खोदणे, हरीत सेना निर्मीती आदी विविध विषयांचा आढावा जिल्हानिहाय सविस्तर घेण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, वृक्ष लागवडीची चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. शासनाने वृक्ष लागवडीसाठी  जास्तीत जास्त सरकारी जमीनीवर वृक्ष रोपण करावे. बैठकीत आमदार सुभाष झांबड, इम्तीयाज जलील, जालना जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, पैठक येथील  नगराध्यक्ष, निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यांनी आपली मते मांडली.