Breaking News

दारूबंदीसाठी बेलवंडी पोलिस निरीक्षकांना निवेदन

अहमदनगर, दि. 24 - बेलवंडी येथील दारू विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना महिलांनी निवेदन दिले श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बु. येथे अनेक दिवसांपासून दारू विक्री व्यवसाय काही लोक करत आहेत. सदरील दारू विक्रेत्यांविरोधात गावातील महिलांनी दारूबंदीची मोहीम उघडली असून दारूमुळे उद्वस्त होणार्‍या अनेक कुटुंबातील  प्रपंचांचा रोष महिलांच्या मनामध्ये आहे. त्या संदर्भात महिलांनी मा.तहसिलदार तसेच मा. जिल्हाधिकारी  व पोलिस अधिक्षकांनाही निवेदन दिले आहे. परंतु याचा काहीच परिणाम झालेला दिसत नसल्यामुळे बेलवंडी गावातील महिलांनी पोलिस निरीक्षकाना दि. 22 जून 2017 रोजी निवेदन दिले.त्याचबरोबर सदरील दारूविक्री करणार्‍या इसमांकडून दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्‍या महिलांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची व घातपात करण्याची धमकी दिली जात असल्यामुळे महिलांच्या मनामध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे.त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास लोकअधिकार आंदोलन,दारुबंदी क्रुती समिती बेलवंडी बु.यांच्यावतीने रास्तारोको चा ईशारा देण्यात आला. निवेदण देण्यास गेलेल्या महिलांना पोलिस निरीक्षक  ठाण्यात नसल्याचे समजताच महिलांनी दारासमोरच ठीय्या मांडला मात्र काही वेळाने ठाण्यात दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक साहेबानी सदरील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.त्याचबरोबर गावच्या सरपंच सरस्वती डाके यांनी महिलांची भेट घेत सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी लोकअधिकार आंदोलनाच्या महिला तालुका संघटक पल्लवी शेलार,  जयश्री  काळे,छाया शिंदे, छायाताई ईथापे, ज्योती ईथापे, गिरीजाबाई  शेलार,अबिता अवघडे, लक्ष्मी धोत्रे यांच्यासह फार मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थीत होत्या. अशी माहिती लोकअधिकार आंदोलन संघटनेचे जिल्हासचिव प्रमोद काळे यांनी दिली.