Breaking News

दाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडे गायला हवेत - अतुल पेठे

पुणे, दि. 03 - ज्याप्रमाणे शूरवीरांचे पोवाडे गायले जातात. त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणार्‍या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडे देखील गायला  हवेत. कला ही प्रवाही असायला हवी. नवीन गोष्टींना सामावून घेणारी कला हवी. यासाठी विचार सन्मुख करणारे साहित्य वाचायला हवे. आपले पोवाडे, लावण्या हे  आपले वैभव आहे, परंतु त्यांना पुढे न्यायचे असेल तर नवीन गोष्टी अंगिकारत जुन्यांमध्ये देखील बदल करायला हवेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे  यांनी व्यक्त केली. 
कै. शाहीरसम्राट किसनराव हिंगे यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे  अध्यक्ष शरद कुंटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोहर जाधव, सरदार दाभाडे घराण्याच्या वंशज माँसाहेब वृषालीराजे दाभाडे,  प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.
अतुल पेठे म्हणाले की, कला ही सामाजिक प्रबोधनासाठी आहे. आज जगातील अस्थिरता बघता आपल्याला शांत होण्याची गरज आहे. यासाठी शांततेचे गुणगान  गाणारा आणि अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारा पोवाडा गायला हवा. जग बदलायचे असेल तर ते हिंसेने नाही तर सकारात्मक विचारांनी बदलायला हवे. हे बदल  घडविण्यासाठी चांगले विचार समोर यायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.
शरद कुंटे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचे शौर्य समाजापर्यंत पोहचविण्याचे काम हे शाहिरीच्या माध्यमातून झाले. या कलेतून इंग्रजांविरूध्द लढण्याचे बळ  दिले, परंतु आज समाजातील वाईट प्रवृत्तींविरूध्द लढण्याची गरज आहे. नवीन पिढीला देशभक्तीने प्रेरीत करायचे असेल, तर शाहिरी काव्याशिवाय पर्याय नाही ,  असेही त्यांनी सांगितले.
डॉ. जाधव म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांमधील विचारक्षमता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्‍न पडतील असे शिक्षण दिले पाहिजे. तरच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड  निर्माण होईल. पोवाडा वर्गातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती दिली जाते. असे कलेचे वर्ग वाढायला हवेत. कार्यक्रमात शाहिरी निनाद -अमर शाहिरी या  विशेषांकाचे प्रकाशन झाले. तसेच कै. शाहीरसम्राट किसनराव हिंगे यांचे सहकारी ढोलकीवादक बंडा देशमुख यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. शाहीर हेमंत  मावळे आणि सहकारी यांनी यावेळी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. पोवाडा वर्गातील बालशाहिरांना देखील गौरविण्यात आले.शाहीरा प्रा. रुपाली मावळे- देशपांडे  यांनी सूत्रसंचालन केले. गणेश टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. अरुणकुमार बाभुळगांवकर यांनी आभार मानले.