Breaking News

पंडीतराव! कुठे फेडणार हे पाप....?

दि. 08, जून - सत्तेची हाव आत्मसन्मानाचा लिलाव करून कशी लाचार अन् निर्लज्ज याचा ज्वलंत अनुभव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात सात दिवसापासून सुरू  असलेल्या संपाने देशाला दिला. मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस असो नाही तर शरद पवार, उध्दव ठाकरे असोत नाही तर स्वाभीमानी नेते.सारेच सत्तेचे बटीक झाल्याचे  चिञ या संपाने उभे केले आहे. एका बाजुला राजकारणी सत्तेचा भोग घेण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी देत असतांना उर्जित पटेल, अरूंधती भट्टाचार्य यांच्या जातकुळीतील  प्रशासकीय गोचड्याही शेतकर्‍यांचे रक्त शोषण्याचे पाप करीत आहेत.
एक जुन पासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन भाजप शासित राज्यातील जगाचा पोशिंदा आपला हक्क पदरात पाडून घेण्यासाठी जीवाचा आकांत करीत आहे.हा  आक्रोश कानाचे पडदे फाटलेल्या शासनकर्त्यांपर्यत पोहचत नाही.किंबहुना शेतकर्‍याला फसवून सत्ता मिळविलेल्या या मंडळींमध्ये दातृत्वाची औकात नसल्यामुळे न्याय  मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. या दोन्ही राज्यात एकाच पक्षाची सत्ता आहे, हे विशेष.उत्तर प्रदेशातही याच पक्षाची सत्ता असतांना जी मागणी तात्काळ मान्य  केली जाते त्या मागणीसाठी त्याच पक्षाचे अन्य दोन राज्यांचे सरकार शेतकर्‍यांच्या जीवावर उठते.याचा अर्थ काय? खरे तर या सरकारच्या शेतकरी द्रोही धोरणामुळे  सात दिवसात आठ बळी गेलेत. याची नोंद इतिहास घेतल्याशिवाय राहणार नाही. मध्यप्रदेश सरकारने संप दडपण्यासाठी केलेल्या गोळीबारात सहा शेतकर्‍यांना  आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्रात थेट गोळीबार करण्याची सरकारची हिम्मत झाली नसली तरी अन्य सारे मार्ग चोखाळून संप मोडण्याचा नतद्रष्टपणा झालाच  नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पध्दतीने महाराष्ट्र सरकारच्या नावावरही दोन बळी नोंदवले गेलेत. संपाच्या तिसर्‍याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यात पोलीसांच्या  लाठीचा मार चुकवितांना पळत सुटलेल्या अशोक मोरे नावाच्या शेतकर्‍याला हृदय विकाराचा झटका येऊन प्राणास मुकावे लागले. त्यानंतर सलग पाच दिवस संपात  सक्रीय सहभाग नोंदवूनही हातात धतूरा सुध्दा सरकारने ठेवला नाही या नैराश्यातून नाशिक जिल्ह्यातील नवनाथ भालेराव या तरूण शेतकर्‍याने विषारी औषध सेवन  करून आयुष्य संपविले. याच काळात आधीच्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातच दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. आंदोलन ऐन भरात आले असतानाच  सरकारकडून राबविली जात असलेली कुटील नितीच या गोष्टीला कारणीभूत आहे.
इकडे संप सुरू असतांना संपात पक्षाला सक्रीय करून स्वतः केवळ निवेदन करणारे शरद पवार बिड जिल्ह्यातील एका कंत्राट प्रकरणाच्या बातम्या माध्यमांवर झळकू  लागताच तातडीने मोदींच्या दरबारात पायधूळ झाडून आले. शरद पवार यांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर संप सुरू होण्यापुर्वी किंवा सुरूवातीच्या दोन तीन दिवसातही  मोदींची भेट घेणे शक्य होते. तथापी ईडीच्या त्या बातम्यानंतर शरद पवारांची दिल्लीवारी नक्की कशासाठी हा प्रश्‍न उपस्थित झाला तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.
शिवसेना किंवा स्वाभीमानी संघटना यांची भुमिका तर एखाद्या सराईत पण माफिचा साक्षीदार बनणार्‍या दरोडेखोरासारखी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मांडीवर बसून लोण्याचा  गोळा चाखायचा आणि भोपळ्यातील म्हातारी सारखं ताजेतवाणे होऊन रस्त्यावर येऊन दगडफेक करायची. यांचा हा उद्योग कुलटेच्या स्वभावालाही शरमेने मान  खाली घालण्यास मजबूर करीत आहे.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही मारल्यानंतर शेतकर्‍यांच्याच अन्नावर ढेकर देऊन ढेरी चोळणारे नोकरशहा निर्लज्जपणे शेतकर्‍याला नागडं करू लागले तर नवल  काय? कोण त्या अरूंधती भट्टाचार्य आणि अंबानींचे सोयरे उर्जित पटेल शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला हेतुपुर्रस्सर विरोध करीत आहेत. कर्जमाफीला विरोध करतांनी ही  विद्वान मंडळी जे तार्कीक मांडतांत ते अर्थशास्राच्या निकषावर टिकणारे नाही हे या विद्वानांना समजू नये हे खरतर भारतीय अर्थव्यवस्थेच दुर्दैव आहे. या देशात  हीच  मंडळी अर्थव्यवास्था कुरतडणार्‍या उंदरांना मनसोक्त सवलती देतात, तेंव्हा त्यांची दातखीळ बसते.कर्जबुडव्या मल्ल्यामुळे अर्थव्यवस्था कोणती बळकट झाली? या  प्रश्‍नाचे उत्तर देण्यास त्यांचे थोबाड उचकत नाही. ज्या शेतकर्‍यामुळे देशाची अर्थव्यवस्था खर्‍या अर्थाने मजबुत होते त्या शेतकर्यांना मदत करतांना यांच्या हाताला  लकवा का होतो?  अन्नदात्याचा तळतळाट घेणारे हे पंडीत कुठे फेडणार हे पाप?