Breaking News

सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

मुंबई, दि. 08 - पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी संप मागे घेतला असला तरी नाशिकमधील शेतकर्‍यांचा संप सुरु आहे. शेतकर्‍यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे.  काही ठिकाणी शेतकर्‍यांचा संप सुरु आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची आज बैठक होणार आहे. शेतकरी संपावर  तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नव्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या आज होणार्‍या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार याकडे सर्वांच  लक्ष लागलं आहे.
पुणतांब्यातील शेतकर्‍यांच्या संपाचा काल (बुधवार) शेवटचा दिवस असला तरी नाशिकमधील संप सुरुच असल्याचं शेतकर्‍यांनी सांगितलं. खासदार राजू शेट्टी,  आमदार बच्चू कडू आदींसह सुकाणू समिती सदस्यांच्या बैठकीनंतरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असं मत शेतकर्‍यांनी व्यक्त केलं आहे. संपामुळे गेल्या  आठवड्याभरात जिल्ह्यातील शेतकर्‍यांचं सुमारे 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे संप अजून जितके दिवस चालेल, तेवढं शेतकर्‍यांचं नुकसान होणार  आहे. आता संप करण्याची आमची मानसिकता नाही. संप काळात आमचं खूप नुकसान झालं. आधीच मेटाकुटीला आलोय, त्यात नुकसान झालं. आता काहीही झालं  तरी भाजीपाला बाजारात आणणारच, अशी प्रतिक्रिया एका शेतकर्‍याने एबीपी माझाला दिली.
पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाज्यांची 100 टक्के आवक झाली आहे. बाजार समितीत 1 हजार 83 भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत. तर  नाशिकमधील बाजार समितीही पुन्हा गजबजली. बाजार समितीत भाज्यांची आवक पूर्वपदावर आली असून शेकडो वाहनं भरुन भाजीपाला दाखल झाला आहे.  दुसरीकडे नवी मुंबईतीव वाशी एपीएमसीमध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत 530 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे.