Breaking News

लढा सुरू होण्याआधीच स्वतंत्र मराठवाड्याचे चक्क मंत्रीमंडळही जाहीर !

औरंगाबाद, दि. 12 - स्वतंत्र मराठवाड्याची मागणी, बोटावर मोजण्याइतके प्रचंड कार्यकर्ते, त्यातच स्वतंत्र मराठवाड्याची संघर्ष समिती स्थापन करतानाच शेखचिल्ली  पद्धतीने स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रीमंडळही जाहीर केले तेव्हा या अतिशयोक्तीने उपस्थित तुटपुंज्या लोकांच्या चेहर्यावरही उपहासाचा हंशा पिकला ! 
पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा  देण्या करीता या स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली.
या बैठकीच्यावेळी चंद्रभान पारखे, द्वारकाभाऊ पार्थीकर, प्रा.बाबा उगले, प्रा.एस.ए.सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. जे.के.जाधव यांनी सांगितले की, मराठवाडा  स्वतंत्र राज्य करण्यासाठी आम्ही दोन पातळीवर लढा देणार आहोत. यासंदर्भात 18 रोजी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 20 रोजी विभागीय  आयुक्ताना निवेदन देण्यात येईल व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर अगोदरचे तीन दिवस चक्री उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल,  मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. या दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठवाडावादी लोकांच्या बैठकाघेऊन जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात  येणार आहेत.
गं.आ.नागरे यांनी सांगितले की, मराठवाड्याचा अनुशेष 2 लाख 30 हजार कोटींवर जाऊ पोहोचला आहे. यात सिंचन 55 हजार कोटी, रस्ते 3900 कोटी, उद्योग  125000 कोटी, कृषी 25000 कोटी, कृषी प्रक्रिया उद्योग 10000 कोटी, सहकार 1300 कोटी, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण 1 हजार कोटी,शिक्षण 1 हजार  कोटी,वीज 7419 कोटी, पर्यटन 1 हजार कोटींचा अनुशेष निर्माण झाला असून अशाने विभागाविभागात समतोल कसा साधणार असे ते म्हणाले. कहर म्हणजे यावेळी  प्राचार्य गायकवाड यांनी यावेळी स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रीमंडळही जाहीर करून टाकले. यात मुख्यमंत्री द्वारकाभाऊ पार्थीकर तर अर्थमंत्री म्हणून जे.के.जाधव यांचा  उल्लेख करताच हास्य पिकले.