Breaking News

पाकिस्तानी खेळाडू मालामाल, रोख रकमेसह जमिनीही इनाम

इस्लामाबाद, दि. 21 - चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवणारा सरफराज अहमदचा पाकिस्तानी संघ रातोरात मालामाल झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघातील  खेळाडूंना रोख रकमेसह जमीनीही इनाममध्ये देण्यात आल्या आहेत. सलामीवीर फखर झमान, वेगवान गोलंदाज रुमान रईस आणि ऑलराऊंडर फाहिम अशरफ या  नवख्या खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवलीच. पण अवघे 7 वन डे खेळणारा 18 वर्षाचा शादाब खानने जगाचं लक्ष वेधून घेतलं.
याशिवाय कर्णधार सरफराज अहमद, बाबर आझम, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम हे सर्व पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळले.  या सर्वांनी सांघिक  भावनेने खेळ करुन, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर सहज विजय मिळवला. या विजयामुळेच पाकिस्तानी संघाचं त्यांच्या देशात जंगी स्वागत करण्यात आलंच, पण  त्यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.
पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी संघातील प्रत्येक खेळाडूला 1-1 कोटी रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना 2 कोटी  90 लाख रुपयांचा रोख बोनस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय बोर्ड प्रत्येक खेळाडूला दहा-दहा लाख रुपये बोनस देणार आहे. दुसरीकडे आयसीसीकडून  विजेत्या संघाला दिली जाणारी 20 कोटी रुपयांचं बक्षीसही पाकिस्तानी संघाला मिळाली. तसंच बिल्डर रियाज मलिक यांनी प्रत्येक खेळाडूसाठी 10-10  लाख  रुपये आणि प्लॉट देण्याची घोषणाही केली आहे.