Breaking News

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 17 - राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन 481 किलोमीटरची करण्यात आलेली कामे तसेच दर्जेदार व गुणवत्तापुर्ण  करण्यात आलेली रस्त्यांची कामे आणि दिलेल्या रस्त्यांच्या लांबीचे उद्दिष्टही कालमर्यादेत करण्यात आले असल्याने देशात महाराष्ट्र राज्याला ग्रामसडक योजनेत उत्कृष्ट  पुरस्कार जाहीर झाला असून दि. 19 जून रोजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील न जोडलेली गावे, लोकवस्त्या बारमाही रस्त्यांद्वारे जोडण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली असून राज्यात ग्राम  विकास विभागांतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 24 हजार 427 किलोमीटर लांबीची कामे मंजूर झाली असून यापैकी मे  2017 पर्यंत 23 हजार 339 किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. यामध्ये 3 हजार 622 किलोमीटर नवीन जोडणी तर 19 हजार 717 किलोमीटर रस्त्यांची  दर्जोन्नती करण्यात आली आहे. ही कामे देशात उत्कृष्ट असल्याने केंद्र शासनाने महाराष्ट्राला उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार जाहीर केला असल्याचे ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु करण्यात आली असून राज्यात न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठीच्या  रस्त्यांची लांबी व अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात  येणार्‍या रस्त्यांची कामेही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेइतकी गुणवत्तापूर्ण करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटर रस्त्यांची दर्जोन्नतीची कामे  टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून 730 किलोमीटरची नवीन जोडणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.