Breaking News

शिराळा नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य व विषय समिती सभापतीपदी निवडी बिनविरोध

सांगली, दि. 23 - शिराळा नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्‍वप्रतापसिंह भगतसिंग नाईक, तर भारतीय जनता पक्ष- महाडिक युवा शक्ती  आघाडीच्यावतीने केदार नितीन नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडीही बिनविरोध झाल्या.
शिराळा नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, तर विरोधी भाजप- महाडिक युवा शक्ती आघाडीचे सहा सदस्य आहेत. स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी  काँग्रेसच्यावतीने विश्‍वप्रतापसिंह नाईक, तर विरोधी आघाडीच्यावतीने केदार नलवडे यांचे एकमेव अर्ज आले. त्यामुळे या दोघांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड  झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी जाहीर केले. या निवडीवेळी तहसिलदार दीपक शिंदे व मुख्याधिकारी अशोक कुंभार आदी  उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या विशेष सभेत विविध विषय समित्यांच्या निवडीही बिनविरोध पार पडल्या. त्यात स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा श्रीमती सुनंदा सोनटक्के,  बांधकाम, शिक्षण व नियोजन सभापतीपदी गौतम पोटे, पाणीपुरवठा सभापतीपदी संजय हिरवडेकर, आरोग्य सभापतीपदी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, तर महिला  व बालकल्याण समिती सभापतीपदी श्रीमती सुजाता इंगवले यांची निवड झाली. या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा विजय नलवडे, ऍड. भगतसिंग नाईक, विश्‍वास कदम,  श्रीमती प्रतिभा पवार व शिराळा गावचे माजी सरपंच देवेंद्र पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.