Breaking News

सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा विचार - खा . राजू शेट्टी

मुंबई, दि. 06 - केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय घेत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप  सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या विचारात आहे असे संघटनेचे प्रमुख खा . राजू शेट्टी यांनी आज सांगितले. 
शेतकर्‍यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना खा . शेट्टी म्हणाले की , 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आम्हाला  स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते . त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते . स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने आमची  संघटना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावी असा प्रस्ताव मांडण्यात आला होता . या संदर्भात आम्ही मोदी यांच्या भेटीसाठी अहमदाबाद येथे गेले होतो .  त्यावेळी त्यांनाही आम्हाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणू असे स्पष्ट आश्‍वासन दिले होते. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात  शेतकर्‍यांना सध्याच्या भावापेक्षा दुप्पट भाव मिळवून देऊ असे सांगितले होते . सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला आपल्या आश्‍वासनांचा विसर पडला आहे.
खा . शेट्टी यांनी पुढे सांगितले की, केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकर्‍यांसाठी काहीच करायला तयार नसल्याने आम्ही या सरकारला दिलेला पाठिंबा काढून  घेण्याचा विचार करत आहोत . हा निर्णय आम्ही योग्य वेळी जाहीर करू .
सदाभाऊ खोत यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले की , सदाभाऊंनी हा संप मिटवण्यासाठी केलेल्या हालचालींनी शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.  आता सदाभाऊ चळवळीचे कार्यकर्ते नव्हे तर सरकारचे प्रतिनिधी झाले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत जाब विचारू. त्यांचे  म्हणणे ऐकून त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल.