Breaking News

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

औरंगाबाद, दि. 04 - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला अपघात झाला असून ही गाडी जालना रोडवरील एका डिव्हयटरवर गेली. या  अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी गाडीचे नुकसान खूप झाले. ताफ्यातील अपघातग्रस्त गाडीच्या मागील गाड्यांच्या चालकांनी आपल्या वाहनांवर  नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह कोणालाही कसलीही इजा झाली नाही. 
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा आज मराठवाड्यात दौरा होता. औरंगाबाद येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे उद्घाटन झाले. त्यानंतर जालन्याकडून औरंगाबादच्या दिशेने  येत असताना सेव्हन हिलच्या उड्डाणपुलाजवळ उच्चन्यायालयाच्या पुढे आले असता महापौरांच्या ताफ्यातील गाडी क्रमांक एमएच 20 सीयू 178 ही गाडी अचानक  रस्तादुभाजकास धडकून दुभाजकावर चढली आणि गाडीचे चाक निखळले. पाठीमागील गाड्यांनी मोठ्या प्रयत्नाने आपल्या गाड्यांच्या वेगावर नियंत्रण मिळवून त्या  गाड्या थांबल्या. या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही हे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. सुरेश प्रभू यांच्या गाड्यांचा ताफा स्टेशन रोडवरील  व्हिटस् हॉटेलकडे गेला. तेथे प्रभू यांनी शहरातील उद्योजकांशी संवाद साधला व रेल्वेविषयक त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.