Breaking News

पत्नीस विष पाजून पतीची आत्महत्या

सांगली, दि. 04 - असाध्य रोग झाल्याच्या नैराश्यातून पत्नीस विष पाजून व पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी साडे  अकरा वाजण्याच्या सुमारास मायाक्कानगर (कवलापूर, ता. मिरज) येथे घडली. जखमी पत्नी पूजा शंकर भोसले (वय 30) हिच्यावर उपचार सुरू असून शंकर कृष्णा  भोसले (वय 35) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
मायाक्कानगर परिसरात शंकर भोसले पत्नी पूजा भोसले व दोन मुलांसह रहात होते. शंकर भोसले गेल्या काही वर्षापासून असाध्य रोगामुळे त्रस्त होते. त्यातूनच  शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शंकर भोसले याने पत्नी पूजा भोसले हिला तुझ्यामुळेच मला हा त्रास होत आहे, असा आरोप करीत तिला मारहाण  केली. तिच्या हाताच्या नसा कापून तिला जबरदस्तीने विष पाजले. त्यानंतर शंकर भोसले याने स्वतःच्याही हाताच्या नसा कापून घेऊन राहत्या घरी गळफास घेऊन  आत्महत्या केली.
याचवेळी राजाक्का काशिनाथ जगताप (रा. मायाक्कानगर) या शंकर भोसले याच्या घरी आल्या असता पूजा भोसले या जखमी अवस्थेत आढळल्या. त्यांनी तात्काळ  आरडाओरडा करून शेजार्यांना बोलावले व जखमी पूजा भोसले यांना तात्काळ येथील वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी  राजाक्का जगताप यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोगरे करीत आहेत.