Breaking News

कराड तालुक्यातील 12 गावांच्या सिटी सर्व्हेचा प्रश्‍न निकालात

कराड, दि. 23 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील अनेक गावांचा सिटी सर्व्हे होऊनही त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नव्हती. यासाठी या गावच्या ग्रामस्थांना गेल्या 25 वर्षापासून पाठपुरावा केला होता. दरम्यान, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन सिटी सर्व्हेला अंतिम मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती, त्यास यश आले आहे.
कराड तालुक्यातील 12 गावांच्या सिटीसर्व्हे आदेशाला अंतिम मंजुरी दिल्याचा आदेश जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी नुकताच जारी केला आहे. या आदेशामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डॉ. भोसले यांचे आभार मानले आहेत. कराड तालुक्यातील जखिणवाडी, कोयना वसाहत, खोडशी, गोळेश्‍वर, चचेगाव, नांदलापूर, नारायणवाडी, सुपने, कोडोली, पेरले, चिखली, बनवडी आणि बेलवडे हवेली या गावांचा 1992 साली सिटी सर्व्हे झाला आहे. सिटी सर्व्हे अधिसूचनेप्रमाणे ही गावे गावठाणाकडे वर्ग झाली आहेत. पण याबाबत अंतिम मंजुरीचा आदेश न झाल्याने या गावांना शासनाने सिटी सर्व्हे लागू केला नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना स्वताच्या मालकीची मालमत्ता कर्जास तारण देताना अनेक अडचणी येत होत्या. सिटीसर्व्हे अंतिम मंजुरी आदेश प्राप्त झाल्याने या गावांना गावठाण मंजूर होणार आहे. त्यामुळे नवीन बांधकामे करणार्‍यांच्या समोरील अडचणी कमी होणार आहेत.