Breaking News

भारत शांतताप्रिय देश - महापौर मुक्ता टिळक

पुणे, दि. 05 - भारत हा शांतताप्रिय देश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध क अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राकडून देखील  भारतीय विद्यार्थांचे स्वागतच केले जाते. त्यामुळे अमेरिकेतील भौतिक समृद्धता आणि भारतीय संस्कृती याचा मेळ घालत विद्यार्थांनी प्रगतीचे अवकाश काबीज करावे,  असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 
दिलीप ओकस् ऍकॅडमीतर्फे अमेरिकेत जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अमेरिका प्रयाणपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम महापौर टिळक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ऍकॅडमीचे  संस्थापक अध्यक्ष दिलीप ओक, अतुल लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी टोफेल, जीआरई आदी परीक्षांमध्ये उच्चश्रेणी प्राप्त केलेल्या आणि अमेरिकेतील अग्रगण्य  विद्यापीठांमध्ये नंबर लागलेल्या काही विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
टिळक म्हणाल्या, उच्चशिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेसारख्या देशात गेल्यानंतर तेथील शिक्षण पूर्ण करून अनुभवसंपन्न होऊन भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशी  परलतल्यानंतर देशाच्या प्रगतीस हातभार लावला पाहिजे. ज्याप्रमाणे डॉलरला किंमत आहे तशीच किंमत भारतीय रुपायाला प्राप्त होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न  केले पाहिजे. दिलीप ओक म्हणाले, ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यामुळे अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला, हा  गैरसमज आहे. अमेरिकन विद्यापीठांमध्ये आजही भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागतच होते. दरवर्षी भारतातील सुमारे 35,000 विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये  उच्चशिक्षणासाठी जातात. तेथील काही मुलभूत नियम आणि शिस्त पाळल्यास अमेरिका भारतीयांसाठी फ्रेंडली देश म्हणून परिचीत आहे.