स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
बुलडाणा, दि. 27 - जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुडवणार्या संचालकाकडून थकीत वसुली करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. तसेच शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही बँक सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली. निवेदनात नमुद केले की, येथील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर राजकीय नेत्यांनी 209 कोटींचा डल्ला मारून बँक बुडवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना कर्जापासून वंचित रहावे लागत आहे. संचालकाकडून वसुली करून बँक पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे अनेक वेळा करण्यात आली. परंतु अद्यापही शासनाने कुठलीच कारवाई केली नाही. नुकतीच सरकारने कर्ज माफीची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या संचालकांनी जिल्हा बँक बुडवली, त्या संचालकांना कर्ज माफीचा फायदा देण्यात येऊ नये. तसेच त्यांची मालमत्ता जप्त करून वसुली करावी. जेणेकरून शेतकर्यांनी पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होईल. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राणा चंदन, कैलास फाटे, अमिनखाँसाब, ज्ञानदेव हरमकार, हरिभाऊ उबरहंडे, शेख साजीद, तुषार काचकुरे, शेख रफीक, अनिल पडोळ यांनी दिला आहे.