भूमिहिनांना आर्थिक मदत देवून जमीन पट्टे वाटप करा!
सामाजिक न्याय दिनी सामाजकल्याण अधिकार्यांना दिले निवेदन
बुलडाणा, दि. 27 - दि.26 जून रोजी सामाजिक न्याय दिनी भूमीहिनांच्या व शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनला ताला ठोका आंदोलनाचा इशारा भूमीमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा संघटनांच्या वतीने देण्यात आला होता. परंतु जिल्हाधिकारी व समाजकल्याण अधिकार्यांसह पोलिसांनी मध्यस्थी केल्याने संघटनाप्रमुख प्रदीपभाई अंभोरे यांनी तालाठोको आंदोलन मागे घेवून जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनोज मेरत, तहसिलदार सुरेश बगळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सामाजिक न्याय भवन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देण्यात आले.यावेळी सकाळपासूनच पोलिसांची मोठी दमछाक झाली होती. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून ठाणेदार हिवाळे व उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी हेही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपल्या फौजफाट्यासह सामाजिक न्याय भवनच्या प्रवेशद्वारावर तळ ठोकून होते. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे दोन्ही संघटनांनी ताला ठोको आंदोलन मागे घेतल्याचे अंभोरे यांनी यावेळी सांगितले व जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनोज मेरत व तहसिलदार सुरेश बगळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात राज्यभरातील बहुजन भूमिहिन, शेतमजुर, कष्टकरी, कामगार, बेरोजगारांचे विविध महामंडळे, अल्पसंख्यांक महामंडळे, महिला आर्थिक विकास महामंडळ व दारिद्य रेषा महिला, पुरुष गटाचे सर्वेक्षण करुन भूमिहिनांचे शंभरटक्के कर्जमुक्ती करण्यात यावी, सरसकट कर्जमुक्ती घोषित करावी, आर्थिक मदत तात्काळ वाटप करावी, शासकीय वन महसूल जमीनदारांना शासन निर्णयाप्रमाणे ताब्यात असलेल्या जमिनीचे कायम पट्टे वाटप करुन भूमीमुक्ती करावी. मासवर्गीय अतिक्रमण, आदिवासी, अल्पसंख्यांक, बहुजन समाज अन्याय अत्याचार प्रतिबंध व दोषींवर कार्यवाही करुन संपूर्ण जिल्हा दारुमुक्त करावा, पत्रकार प्रशांत कांबळे यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावर भाई प्रदीप अंभोरे, अतिशभाई खराटे, रमेश गाडेकर, भिमराव खरात, लक्ष्मण ठोसरे, शेषराव चव्हाण, मधुकर मिसाळ, राजेंद्र सुरडकर, गजानन जाधव, भगवान चाटे, सुभाष घुगे, अनिस पठाण, निलेश बाभुळकर आदींच्या सह्या आहेत.
