Breaking News

मध्य प्रदेश ; पोलीस गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना एक कोटी

भोपाळ, दि. 07 - मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या संपाने हिंसक वळण घेतल्यामुळे यात पाच शेतकरी मारले गेले आहेत. या शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना  एक कोटीच्या अर्थसहाय्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांमधील एका सदस्याला सरकारी  नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले.
या हिंसाचारात जखमी झालेल्यांना पाच लाख देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. मंदसौरमध्ये घडलेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी आहे. या हिंसाचारात जखमी  झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाईल,असे ट्विटही त्यांनी केले. शेतकर्‍यांना संयम बाळगावा. कोणाचाही भूलथापांना बळी पडू नये, असा सल्लाही  त्यांनी दिला. दरम्यान, मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून कर्जमाफी, शेतमालाला रास्त भाव आदी  मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर मंदसौर जिल्ह्यात कमालीचे तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा , दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत . सर्वत्र कडक  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.