स्वतःऐवजी इतरांना तलाठ्याचे काम देणार्यांची चौकशी करण्याचे आदेश
औरंगाबाद, दि. 03 - बहुतांश गावांमध्ये तलाठ्यांचे काम त्यांचे नातेवाईक किंवा त्यांनी कामाला ठेवलेले इतर कर्मचारी (झिरो तलाठी) करत आहेत. त्यामुळे नोंदी घेण्याच्या कामामध्ये चुका होतात. अशा झिरो तलाठी कामावर ठेवणार्यांची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनंदपूर सजाच्या तलाठ्याचे काम त्याचा भाऊ करत असल्याची माहिती दिली. अशीच स्थिती अनेक गावांमध्ये असून, मूळ तलाठ्यांनी विविध कामे करण्यासाठी मुलांना ठेवले आहे. त्यांन झिरो तलाठी असे म्हणतात. हे मुले उलट सुलट नोंदी घेतात. गेल्यावर्षी दुष्काळी अनुदानात पैठण तालुक्यात अशा तलाठ्यांमुळेच गोंधळ झाल्याचेही भुमरे यांनी बैठकीत सांगितले. याच मुद्द्यावर आमदार अब्दुल सत्तार यांनीही, सिल्लोड तालुक्यातील 17 गावांमधील शेतकर्यांना केवळ तलाठ्यांच्या चुकांमुळे अनुदानापासून वंचित रहावे लागले. शासन त्यांना अनुदान देणार का, असा प्रश्न उपस्थित केला. झिरो तलाठी या प्रकरणाची तत्काळ लेखी तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्याचे सांगत जिल्हाधिकार्यांनी कामावर गैरहजर राहणारे तलाठी; तसेच तलाठ्यांचे काम करणारे झिरो तलाठ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदानात मोठी अनियमितता आढळली होती, नोंदी घेण्यात तलाठ्यांचा महत्त्वाची भूमिका होती. जमीन नसताना अनुदान मिळणे, कोरडवाहू जमिनीवर फळबागांचे अनुदान, जमिनीच्या खरेदीविक्री व्यवहारामध्ये खरेदीदाराचे नाव सातबार्यावर न लागल्यामुळे जुन्याच शेतीमालकाच्या नावावर अनुदान टाकणे, एकाच शेतकर्यांच्या नावावर दोनदा अनुदान टाकण्यात आल्याचे प्रकार घडले होते. सातबारावरील नोंदींनुसार अनुदानाचे वाटप करण्यात आले होते.
