केमिकल नाकातोंडात गेल्याने 11 कामगार अत्यवस्थ
औरंगाबाद, दि. 03 - वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टर मधील प्लॉट नं. 190 मध्ये असलेल्या सिडलर रेमिडीस प्रा. लि. या औषधी कंपनीतील कामगारांच्या नाका तोंडात केमिकलयुक्त पावडर गेल्याने 11 कामगारांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. ही घटना बुधवार (31 मे) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडली. सिडलर रेमिडीस कंपनीत जवळपास 300 कामगार असून औषधी उत्पादन करणार्या या कंपनीत रक्त शुद्धीकरणासाठी आवश्यक गोळयांचे उत्पादन घेण्यात येते. पेन रिलिफ कॅप्शुल, मोनोपॉज कॅप्सूल इत्यादी औषधी तयार करण्यात येतात. या कंपनीत बहुतअंशी महिला कामगार या खाजगी ठेकेदारामार्फत काम करतात. बुधवारी सायं. 5 वाजेच्या दरम्यान काम करणार्या माया शिंदे, लक्ष्मी राजपूत, सुरेखा वाघमारे, मंगल वाघ, सरिता शर्मा, आशा बनकर, अंबिका राजपूत, वर्षा कर्डिले या महिला कामगार व देवानंद वाकोडे यांच्यासह दोन ते तीन कामगारांच्या केमिकल युक्त पावडर नाकातोंडात गेल्याने जळजळ, चक्कर उलट्याचा त्रास होऊ लागला. की बाब कंपनी व्यवस्थापक जाधव व एच.आर. विभागाचे सुशिल खरात यांच्या लक्षात आल्याने या सर्व कामगारांना तत्काळ बजाजनगर येथे मोरे चौकातील बालाजी जीवनज्योत या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री या रुग्णावर उपचार करून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली रात्रभर ठेवण्यात आले. या घटनेची वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
