Breaking News

मतदान यंत्र फेरफार आव्हान : राष्ट्रवादी , माकप प्रतिनिधी राहिले शांत

नवी दिल्ली, दि. 04 - मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्यासाठी राजकीय पक्षांनी स्विकारलेल्या आव्हानात प्रत्यक्षात काहीही झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या प्रतिनिधींनी केवळ मतदान यंत्राची कार्यप्रणाली जाणून घेतली. याशिवाय तांत्रिक बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला. बंद दरवाज्याआड  झालेल्या घडामोडींमध्ये मतदान यंत्रामधील सुरक्षा यंत्रणा जाणून घेतल्या. माकपच्या प्रतिनिधींनी यंत्रात असलेल्या सुरक्षा प्रणालीचे प्रात्यक्षिक पाहिले. तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या तांत्रिक समितीच्या तज्ञांशी चर्चा केली.या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदान यंत्रात फेरफार करता येतो , हा आपला दावा सिद्ध  करण्यासाठी प्रत्यक्षात काहीच हालचाल केली नाही .
दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड विधानसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रांपैकी राष्ट्रवादी , माकप प्रतिनिधीना चार-चार यंत्रे देण्यात आली  होती. विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान यंत्रात फेरफार करून भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला होता. यंत्रात फेरफार  केल्याने लोकांचा विश्‍वास उडाला असल्याचा दावा प्रमुख विरोधी पक्षांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्याचे  खुले आव्हान दिले होते.