Breaking News

महाराष्ट्र राज्य लोकशाहीमधील अग्रगण्य राज्य - रामराजे नाईक-निंबाळकर

मुंबई, दि. 02 - देशातील संसदीय लोकशाहीची वाटचाल पाहता इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र लोकशाहीमध्ये अग्रगण्य राज्य आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. विधानभवन येथे वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने युवक बिरादरी संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव अंनत कळसे, सह सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, युवक बिरादरी संस्थेचे विद्यार्थी, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. नाईक-निबांळकर म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रात विधानसभा, विधानपरिषदेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. राजकीय व्यवस्थेची वाटचाल पाहता ती ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आहे. यातील सत्तारुढ पक्ष हा जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेऊन सर्वसामान्यांचे हित साधले जावे याचा प्रयत्न करतो. श्री. नाईक-निबांळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी समाजात कार्यरत असताना स्वत:च्या विचारमंथनावर न थांबता राज्यासाठी, देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले. युवक बिरादरीच्या माध्यमातून लोकशाही मुल्य व संसदीय प्रणाली जाणून घेऊन यातून नेतृत्त्व क्षमता आपल्यात रुजवावी, असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीकरिता श्री. नाईक-निबांळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. मदाने यांनी विद्यार्थ्यांना विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची माहिती दिली.