Breaking News

घरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास

सातारा, दि. 12 - वाठार स्थानक (ता. कोरेगाव) येथे अशोक जेबले यांचे किराणा माल दुकान व राहते घर फोडून 2 लाख 63 हजार रुपये रोख व दोन किलो  चांदी व पाच तोळे सोने असा मिळून सुमारे 5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर चोरी झाल्यामुळे अन्य  व्यावसायिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेबले कुटुंबीयांचे वाठार स्थानक येथे होलसेल व रिटेल किराणा मालाचे दुकान व मेडिकल स्टोअर आहे. हे दुकान खाली तर वर पहिल्या मजल्यावर हे कुटुंब रहात  आहे. चंद्रशेखर जेबले व विश्‍वेश्‍वर हे दोघे किराणा दुकान व्यवसाय पाहतात तर शशिकांत हे मेडिकल स्टोअर चालवतात. त्यांच्याकडील असलेले कामगार आपापल्या  घरी गेले. जेवण आटोपल्यानंतर दिवसभराच्या कामाचा हिशोब विश्‍वेश्‍वर व शशिकांत यांनी केला व रोख जमा असलेले 2 लाख 63 हजार रुपयांची रक्कम घरात  असलेल्या जुन्या तिजोरीत ठेवली व तिजोरी असलेल्या खोलीस कुलूप लावून दोघेही झोपण्यास गेले.विश्‍वेश्‍वर यांना दुस-या दिवशी सकाळी लवकर कामानिमित्त  मुंबईला जायचे असल्याने ते रात्री 1 वाजेपर्यंत जागेच होते. पहाटे चार वाजता चंद्रशेखर यांच्या पत्नी उठल्यावर त्यांना तिजोरी असलेल्या खोलीचे दार उघडे दिसले  म्हणून त्यानी पाहिले असता सामान विस्कटलेले दिसून आले त्यांनी आपल्या पतीला चंद्रशेखर यांना याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी विश्‍वेश्‍वर यांना उठवले.  विश्‍वेश्‍वर यांच्या खोलीस बाहेरून कडी लावण्यात आली होती. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना याची कल्पना दिली.
घटनास्थळी कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, सातारा येथील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या  अधिकारर्यांनी भेट देऊन पाहणी केली. श्‍वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. उशीरापर्यंत ते दाखल होऊ शकले नव्हते. अधिक तपास सपोनि लांडे  करीत आहेत.