Breaking News

क्रिकेटमधील काही नियम बदलांना ‘आयसीसी’ची मान्यता

अबुधाबी, दि. 06 - वार्षिक सर्वसाधारण सभेत क्रिकेटच्या नियमांमधील बदलांपैकी काही नियम बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून मान्यता देण्यात आली  आहे. धावचीत बाद होणे, बॅटचे आकारमान आणि पंचांने देण्यात येणारे जादा अधिकार या संबंधिच्या नियमातील बदलांना परिषदेने हिरवा कंदील दाखवला आहे. 
बॅटची जाडी 40 मिलीमीटर आणि बॅटची रूंदी 67 मिमी प्रमाणित करण्यात आली आहे. खेळाडू धाव घेताना बॅट एकदा क्रिजमध्ये टेकली आणि त्यानंतर हवेत  राहिली, तरीही खेळाडूला नाबाद ठरवता येणार आहे. पूर्वी बेल्स उडवताना बॅट क्रिजमध्ये आहे का, हे पाहिले जात होते. तसेच, एखाद्या खेळाडूने असभ्य वर्तन  केल्यास व त्याला समज देऊनही त्याने न ऐकल्यास त्याला मैदानाबाहेर जाण्याचे आदेश देण्याचा अधिकारही पंचांना देण्यात आला आहे.
परिषदेच्या कार्यकारी समितीने या नियमांना मंजूरी दिली असल्याचे समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी सांगितले. हे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार  आहेत.