Breaking News

मान्सूनची तळकोकणात दमदार हजेरी, मुंबईतही पावसाची वर्दी

मुंबई, दि. 09 - मान्सूननं तळकोकणात वर्दी दिली आहे. सिंधुदुर्गच्या सीमेवरच्या भागात कालपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये हजेरी  लावल्यानंतर राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली. आता पुढच्या 72 तासात मान्सूनचं कोकणच्या दिशेनं पुनरागमन होण्याचा अंदाज  पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
राज्यातल्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असताना मुंबईतही रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबई शहर, दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह उपनगरातही  पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसंच दादर, प्रभादेवी, लालबाग, भायखळा भागात रात्री मुसळधार पाऊस झाला. पश्‍चिम उपनगरांमध्येही विलेपार्ले, अंधेरी,  जोगेश्‍वरी, मालाड, कांदिवली, मीरा रोड या भागांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. नवी मुंबईतही पावसाची हजेरी जोरदार होती. रात्रीच्या पावसामुळे मुंबईच्या  हवेत एक वेगळाच गारवा अऩुभवायला मिळत आहे. मात्र पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं पालिकेनं केलेल्या कामांवर प्रश्‍न विचारले जात आहेत.