Breaking News

दिल्ली अब दुर नही... शेतकरी कट्टरवादाची पेरणी

दि. 09, जून - आज पर्यंत या देशाच्या शेतकर्‍याच्या हातात नांगर तर डोक्यात धर्म मातला होता. या देशाने धर्माचा कट्टरवाद सोसला. आता तमाम शेतकरी हातात  आणि डोक्यात फक्त आणि फक्त शेतकरी हाच धर्म घोळवत शेतकर्‍यांशी द्रोह करणार्‍या हैवानाशी लढण्यास सज्ज झाला आहे. हेच खरे तर नाशिक शहरात झालेल्या  शेतकरी परिषदेचे फलित. सात दिवसांच्या संपाला मिळालेल्या अभुतपुर्व प्रतिसादानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या या शेतकरी परिषदेला  प्रादेशिकच नव्हे तर राष्ट्रीय प्रसार माध्यमांनाही प्रत्यक्ष रणभुमीत येऊन दखल घेण्याची इच्छा व्हावी, यातच शेतकर्‍यांच्या भुमिकेचा विजय आहे.प्रतिगामी पुरोगाम्यांच्या  स्वार्थी संघर्षात बोकाळलेला कट्टर धर्मवाद पाहीलेला देश आता कट्टर शेतकरीवादाचा अनुभव घेईल हा परिषदेचा इशाराही सुचक आहे.
बहु आले बहु गेले, या सगळ्यांनीच शेतकर्‍याला नाडले, नागवले. स्वतंत्र भारताच्या राजकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे  कृषीप्रधान म्हणविणार्‍या या देशाचा  शेतकरी उध्वस्त झाला. आतबट्टयाची शेती परवडत नाही. जगण अशक्य झालेला बळीराजा आत्महत्या करीत राज्यकर्ते शेतकर्याच्या भावनांची सतत टिंगल करण्यातच  हशिल मानित आले.
या सार्‍यांचा एकत्रित परिणाम आज दिसतो आहे. आतापर्यंत या देशातील राजकारण्यांनी आपल्या सत्तेची भुक भागविण्यासाठी शेतकर्‍याच्या डोक्यात धर्माची बीजे  पेरली. धर्माच्या नावावर शेतकर्‍याला धर्मजाती पंथात विभागले.एकमेकांत लढवले. परस्परांचे मुडदे पाडण्यास शेतकर्‍याला प्रोत्साहित केले.हातात नांगर आणि डोक्यात  धर्म घेऊन जगणारा शेतकरी धर्मांधांच्या कट्टर धर्मवादाच्या फशी पडला. परिणामी मुळ प्रश्‍नांचे गांभिर्य लक्षात यायला सत्तर वर्षाचा कालावधी आणि जवळपास सव्वा  तीन लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या आत्महत्या छाताडावर घ्याव्या लागल्या.
आता मात्र खरी भानगड बळीराजाच्या लक्षात आली आहे. धर्मवाद जपायचा, कट्टर धर्मवाद जपायचा पण तो त्यांचा धर्मवाद नव्हे तर शेतकरी धर्म आणि या धर्माचा  कट्टरवाद... होय! आता हातात नांगर आणि डोक्यात शेतकरी धर्म असा ठाम निर्धार करून शेतकरी आता एकविसाव्या शतकातील आगळ्या वेगळ्या लढाईला सज्ज  झाला आहे.
नाशिकमध्ये पार पडलेल्या सर्व पक्षीय राज्यव्यापी शेतकरी परिषदेत शेतकर्‍यांनी घेतलेली भुमिका नजिकच्या काळात विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारसाठी धोक्याची  घंटा ठरणारी आहे. या परिषदेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता केवळ फडणवीस सरकारच नव्हे तर मोदी सरकारसाठी आगामी काही काळ  अतिसंवेदनशिल ठरणार आहे. रडायचे नाही तर आता लढायचे आणि आपलं हक्काचं ते सारं मिळवायच हा या परिषदेचा निर्णय शेतकर्‍याचा सातबारा कोरा करून  शेतकरी थांबणार नाही तर स्वामीनाथन आयोगाची अमंलबजावणी, उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव अशा काही प्रमुख मागण्या शेतकरी पदरात पाडून  घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण या आंदोलनात आता बापाचे अश्रू पुसण्यासाठी उच्च शिक्षित टेक्नोसव्ही तरूण पोरं साम दाम दंड भेद नितीचे शस्र परजून  उतरले आहेत. चाणक्य निती आता या पिढीच्या रणनिती समोर फार काळ तग धरणार नाही. हा इशाराही नाशिकच्या परिषदेने दिला आहे, मन की नव्हे तर जन की  बात करावी लागेल असाच या परिषदेचा एकुण सुर होता. शेतकर्‍यांचे हे आंदोलन पुणतांबा, नाशिक किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहीले नाही तर देशव्यापी बनलेल्या  या आंदोलनाच्या धगीत शेतकरी द्रोह करणार्‍या प्रवृत्ती भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकर्‍यांमध्ये वाढत असलेला तिव्र असंतोष देशाच्या नजरेतून सुटला  नाही, याची प्रचिती देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रसार माध्यमांच्या उपस्थितीने दिली. थेट आंदोलकांच्या ग्राउंडवर येऊन परिषदेची दखल घेण्याची राष्ट्रीय  प्रसार माध्यमांना इच्छा झाली हेच खरे तर शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे यश आहे. आता यापुढे धर्म पंथात दंगल होणार नाही सामान्य जनता शेतकरी विरूध्द जनद्रोही  सरकार असा सरळ सामना भविष्यात घडेल हा परिषदेचा इशारा मात्र सुचक आहे.