Breaking News

माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे... : उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग, दि. 24 - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले. महत्त्वाची बाब म्हणजे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले. यावेळी माझे पूर्वीचे सहकारी म्हणत  भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख केला.
या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची आठवण आल्याचं सांगितलं. बाळासाहेबांचे कोकणावर किती प्रेम होतं हे सांगायची गरज नाही कोकणावर त्यांचं  किती प्रेम होतं हेही सांगायला नको, मी काही मंत्री नाही, मात्र याआधी अनेक नेत्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करु अशी घोषणा केली होती. मात्र त्यांच्या पदरात  काय पडलं माहित नाही, असं म्हणत नारायण राणेंना खोचक टोलाही लगावला.
मुंबई आणि कोकण काही वेगळं नाही, आंगणेवाडीला, जत्रांना नवसाला कोकणवासिय आज येतात, उद्या मुंबईला जातात येतात, आता या नव्या रस्त्यामुळे त्यांचा  प्रवास आणखी चांगला होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्वात वेगवान कामं करणारे मंत्री आहेत असं म्हणंत उद्धव ठाकरेंनी  गडकरींचं कौतुक केलं. जशी आपली रक्तवाहिनी असते तसेच रस्ते आणि रेल्वे असतात असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. माझ्या कोकणाला समुद्र किनारे  आहेत, किल्ले आहेत ही ओळख आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे जिल्ह्याला नवीन ओळख मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच रस्ते आणि जलमार्ग आल्यावर  कोकण देशातलं नंबर एकचं पर्यटन केंद्र होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.