Breaking News

राजश्री सुभेदार देवेंद्रजी! मेहेरबानीशी प्रतारणा करू नका...

दि. 02, मे - स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत हित कारभाराचे दाखले आजही उपलब्ध आहेत. आपल्या सुभेदारांना सुभ्याचा अंमल सुपुर्द  करतांना महाराजांनी सर्वप्रथम रयतेच्या विशेषतः कुणब्याचे कल्याण साधण्याची सक्त ताकीद देऊनच कारभार सोपवला. विद्यमान राज्यकर्ते आणि विरोधक  महाराजांचेच नाव घेऊन सत्तेवर येतात. राजकारण करतात. मात्र इप्सित साध्य झाले की महाराजांचे विचारच नाही तर जनतेला दिलेले आश्‍वासनही विसरतात. या  स्मृतीभ्रंश झालेल्या राजकारण्यांना आठवण करून देण्यासाठी ही दखल...
राज्यात पंधरा वर्ष लोकशाही आघाडीचे सरकार असतांना आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या व्यासपीठावरून तत्कालीन सरकारला धारेवर धरीत होते.  शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, शेतकर्‍याला आठ ते बारा तास किमान अखंडीत वीज पुरवठा द्या, शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन वेगवेगळ्या सोयी सवलती द्या.  इतकेच नाही तर अलिकडच्या म्हणजे सत्तेवर येण्यापुर्वी एक वर्ष विरोधी पक्षनेते फडणवीस स्वामीनाथन आयोगाच्या अमंलबजावणीसाठी प्रचंड आग्रही होते. आपल्या  आक्रमक शैलीने सरकारला सळो की पळो करून सोडणारे फडणवीस एकमेव शेतकर्‍यांचे कैवारी असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. शेतकर्‍यांच्या  तत्कालीन आत्महत्यांना सरकारच कसे जबाबदार आहे याची आकडेवारी सादर करून सरकारविरूध्द खुनाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत होते.एव्हढच  कशाला केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर जवळपास सहामहीने राज्यात आघाडी सरकार सत्तेत होते. तेंव्हाही प्रचंड आत्मविश्‍वासाने पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली  शेतकरी दिंडी काढून पंतप्रधान मोदी यांच्या दरबारात शेतकर्‍यांच गार्‍हाणं मांडण्याची वल्गना केली होती.तेंव्हा सत्तेत असलेले आजचे विरोधक फडणवीस हे शेतकर्‍यांना  भडकावीत आहेत, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचे राजकारण करीत आहेत, असा आरोप करीत होते.
आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या शेतकरी जनतेने फडणवीस यांच्या गोडबोलीला भुलून आघाडीला घरचा रस्ता दाखवला.राज्याची सुत्रे भाजपाच्या  पर्यायाने फडणवीस यांच्या हातात विश्‍वासाने दिली. अजित पवार यांच्या एका लघुशंकेचा हिशेब सव्याज चुकता केला.
आज परिस्थिती बदलली .. पण राजकीय. शेतकर्‍यांच्या परिस्थितीत कुठलाच फरक पडला नाही. राजकारण्यांच्या भुमिकेत तेव्हढा फरक पडला आहे. फडणवीस  जाऊन विखे आलेत. पवार जाऊन दानवे शेफारलेत. भंडारी, परिचारक सारख्या प्रवृत्तींची भर मात्र पडली. दोघेही आपली पुर्वीची भुमिका, विचार आणि कर्तृत्व  विसरले.
दोघेही महाराष्ट्राच्या रयतेला त्यांच्या जाणत्या राजाची साद देऊन भुलथापा देऊ लागलेत. जाणत्या राजाचा कारभार माञ जाणिवपुर्वक विसरलेत. ती आठवण  देण्यासाठीच हा प्रपंच. ज्या मागण्यांवर सभागृहात आणि रस्त्यावर फडणवीस आणि कंपनीने आकांडतांडव केला त्याच मागण्यांसाठी शेतकरी आज संपावर आहे.त्या  मागण्या फडणवीस पुर्ण करतील म्हणूनच आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या आघाडीला शेतकर्‍यांनी लाथाळले. त्या मेहेरबानीशी फडणवीस यांनी प्रतारणा करू नये एव्हढीच  संपकर्‍यांची माफक अपेक्षा आहे.