Breaking News

’आप’च्या समावेशावरून विरोधकांत फूट पडण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. 07 - आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत. केंद्रात सरकार स्थापन करता आले नाही, तरी राष्ट्रपती आपला उमेदवार व्हावा, अशी विरोधकांची इच्छा आहे. 
आम आदमी पक्षाच्या समावेशावरून विरोधकांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्षांची आम आदमी पक्षाला समाविष्ट करण्याची इच्छा आहे. मात्र काँग्रेसला ही बाब मान्य नाही. आम आदमी पक्ष हा भाजपचाच एक भाग असल्याची ठाम समजूत काँग्रेसची असल्यामुळे काही झाले तरी ’आप’ला विरोधकांच्या गटात आघाडीत प्रवेश द्यायचा नाही, असे काँग्रेसचे मत आहे. आम आदमी पक्षामुळे काँग्रेसला मिळणार्‍या मतांमध्ये घट झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने गोव्यातील निवडणूक लढवल्यामुळे आमच्या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही, असा आरोप काँग्रेस नेते अजय माकन यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांचे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहे. मात्र अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांना केजरीवाल यांचा विरोधकांमध्ये होणारा समावेश मान्य नाही. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांच्या बोलावलेल्या स्नेहभोजनासाठी केजरीवाल यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. ही सर्व परिस्थिती पाहता विरोधकांची एकजूट किती काळापर्यंत टिकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.