Breaking News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती शेतकर्‍यांना मिळणार - मुख्यमंत्री

बीड, दि. 04 - राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. शेतकर्‍यांचे काही प्रश्‍न घेऊन शेतकरी संपावर गेले, त्यांच्याशी काल रात्री  उशिरापर्यंत चर्चा करुन महत्वाचे अनेक निर्णय घेतले. शेतकर्‍यांच्या पाठिशी कायम ठामपणे उभे राहण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या  इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे गोपीनाथ गडावर केले.
पांगरी कॅम्प येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गोपीनाथ गडावर दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तिसर्‍या पुण्यस्मरण दिनानिमित्त  आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, ग्रामविकासमंत्री  पंकजाताई मुंडे, राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, खा. प्रीतमताई मुंडे, आमदार सर्वश्री लक्ष्मण पवार,  विनायक मेटे, सुजित ठाकूर, अतुल सावे, सुधाकर भालेराव, आर.टी. देशमुख, मोहन फड, भीमराव धोंडे, श्रीमती संगिता ठोंबरे आदी उपस्थित होते.
राज्यातील गरीब, अल्पभूधारक शेतकर्‍यांना या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकर्‍यांना या  कर्जमुक्तीचा लाभ होईल. ज्याचे थकीत कर्ज आहे त्यांना त्यातून बाहेर काढण्यात येईल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे मार्गदर्शक दिवंगत नेते गोपीनाथराव  मुंडे यांनी राज्यातील दीन दुबळ्यांसाठी, गरीबांसाठी, मागासवर्गासाठी, ओबीसींसाठी, अल्पभूधारकांसाठी सातत्याने संघर्ष केला, त्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्ने  केले, त्यांचाच आदर्श घेऊन आमचे सरकार काम करीत आहे. त्यामुळे गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा दुपटीने अधिकची कर्जमुक्ती आम्ही देणारा आहोत,  असेही त्यांनी स्पष्ट केले.