Breaking News

कांदा निर्यातीतून सरकारला 4651 कोटी रुपयांचे परकीय चलन

लासलगाव, दि. 30 - कधी शेतात कांदा जाळून,तर कधी 5 पैसे दराने विकून तर लोकसभेत कांद्याच्या माळा घालून, तर कांद्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या  डोळ्यात पाणी तर भाव पडल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी अशा एक ना अनेक कारणांनी कांदा नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी सरकारसाठी आनंदाची बातमी  म्हणजे कांदा निर्यातीतून सरकारला तब्बल 4651 करोड रुपयांचे परकीय चलन मिळालेले आहे.देशातील कांदा निर्यातीमध्ये पहा 34 लाख 92 हजार टनांचा  निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झालेला आहे.नाशिक जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झालेली आहे. मागील सात वर्षांनंतर कांद्याचा नवा  विक्रमी विक्रम मोडला गेला आहे.
सरकारने कांद्याचे किमान निर्यात मुल्य हटविल्यामुळे कांदा निर्यातीवरील बंधने आपोआपच कमी झाल्याचा आंतराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आले  आहे. यामुळे यंदा कांद्याची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल तिपटीने वाढली आहे. परिणामी यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास हातभार लागला असल्याचे  नाफेड संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले. कांद्याचे मुबलक उत्पादन झाले की भाव गडगडतात, शेतकर्‍यांना कांदा बाजार समितीत आणण्याचा खर्चही परवडत  नाही. देशांतर्गत बाजारपेठेत आज कांद्यास शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळत नसला तरीही भारतीय कांदा आखाती व दक्षिण आशियायी देशांमध्ये चांगला भाव खात  आहे. मागील वर्षी 2015-16 मध्ये 11.14 लाख मेट्रिक असलेली कांदा निर्यात यंदा 34.92 लाख टनांवर पोहचली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट वाढ  झाली आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याचे स्थान पुन्हा स्थापित करणारी ही निर्यात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.