Breaking News

महापालिकेने जागतिक बँकेला 150 कोटींचे कर्ज परत करावे

पुणे, दि. 04 - पिंपरी चिंचवड महापालिकेने 9 वर्षापूर्वी आणि त्यानंतर जागतिक बँकेकडून विविध विकासकामांसाठी 150 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. कर्जापोटी  जागतिक बँकेला दिल्या जाणार्‍या व्याजाचा बोजा शहरातील करदात्यांना निमूटपणे सोसावा लागत आहे. त्यामुळे ही रक्कम जागतिक बँकेला तातडीने देऊन शहरातील  करदात्यांची कर्जातून मुक्तता करावी, अशी मागणी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत आमदार जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेने 2007 नंतर अनेक मोठ्या प्रकल्पांच्या कामांना  सुरुवात केली. परंतु, त्याचदरम्यान केंद्र सरकारची जेएनएनयुआरएम योजना सुरू झाली. त्या अंतर्गतही महापालिकेने अनेक मोठ्या कामांना सुरूवात केली. मात्र निधी  कमी पडत असलेल्या विकासकामांसाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय पुढे आला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने काही मोठ्या प्रकल्पांसाठी जागतिक  बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेने 2008 आणि त्यानंतर काही प्रकल्पांसाठी तब्बल 150 कोटी रुपयांचे कर्ज जागतिक बँकेकडून घेतले. हे कर्ज त्याकाळी कमी व्याजदराने उपलब्ध झाले.  त्यामुळे महापालिकेला मोठी आर्थिक झळ बसली नाही. जागतिक बँकेला दिल्या जाणार्‍या व्याजाची रक्कम अल्प होती. मात्र नंतरच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेतील  चढ उतारामुळे व्याजाच्या दरात वाढ झाली आहे. 150 कोटी रुपयांवर महापालिका भरत असलेले व्याज आणि भारतीय बँकेचे व्याजदर यांचा अभ्यास केला असता,  त्यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.