Breaking News

'ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत छत्तीसगढमध्ये 12 नक्षलवादी ठार; तीन जवान शहिद

रायपूर,दि.26 : छत्तीसगढमधील सुरक्षा यंत्रणा व पोलिसांच्या 'ऑपरेशन प्रहार’ या मोहिमेंतर्गत 12 हून अधिक नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती नक्षलविरोधी मोहिमेचे पोलीस प्रमुख डी.एम. अवस्थी यांनी दिली. सोबतच आणखी 10 जण जखमीही झाले आहेत. या मोहिमेत 3 जवान शहिद झाले असून पाच जण जखमी झाले आहेत, असेही अवस्थी यांनी सांगितले. आज ही विशेष मोहिम संपली. त्याची माहिती अवस्थी यांनी दिली.
दरम्यान सुरक्षा दलांनी दंतेवाडा येथील डोडी तुमनारनजीक एक नक्षलवाद्यांची चौकीही उद्ध्वस्त केली. या चौकीतून पाच हातबॉम्ब व अन्य सामान जप्त करण्यात आले. बीजापूर येथून मोहिम संपवून परतताना झालेल्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले. टोंडामार्का परिसरात जखमी जवानांना मदत करणा-या हेलिकॉप्टरवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या आधी नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी कुख्यात नक्षलवादी कमांडर कोरसा महेश व जायसी यांना ठार केले. सोबतच 9 नक्षलवाद्यांना अटकही केली. बस्तर भागातील कांकेर, सुकमा व बीजापूर या परिसरात शनिवारी सुरू झालेली मोहिम आज रविवारी सकाळी संपली. आज पहाटे आणखी एक जवान शहिद झाला.