Breaking News

बेदाण्यावरील जीएसटी कपातीमुळे व्यापा-यांना 100 कोटीचा फायदा - संजय पाटील

सांगली, दि. 17 - बेदाण्यावर आकारण्यात येणा-या जीएसटी 12 वरून कमी करून तो पाच टक्के केला आहे. त्यामुळे बेदाणा व्यापा-यांचा वार्षिक 100 कोटी  रूपयाहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली.
जीएसटी लागू करण्यात आल्याने बेदाण्यावर करच नको, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकरी व व्यापा-यांनी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन केंद्रीय  अर्थमंत्री अरूण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत बेदाणा हा  जीएसटी करप्रणालीतून संपूर्ण वगळणे शक्य नसल्याचे सांगितले होते. त्यातूनही विनंती केल्यानंतर त्यांनी हा कर 12 टक्क्यावरून पाच टक्के इतका केला होता.
सांगली जिल्ह्यातील बेदाण्याची वार्षिक उलाढाल 1400 ते 1500 कोटी रूपये इतकी आहे. बेदाणा ही ब्रँडेड वस्तू नाही. सन 2007 ते 2009 पर्यंत बेदाण्यावर  तत्कालीन राज्य शासनाने व्हॅट करप्रणालीनुसार कर आकारणी केली होती. त्यामुळे या कालावधीत बेदाणा व्यापाराला मोठा फटका बसला होता. मात्र आपण  पाठपुरावा करून सन 2010 ते 2017 पर्यंत म्हणजे तब्बल आठ वर्षे व्हॅट रद्द करून घेतला होता. त्याचा बेदाणा उत्पादक शेतकरी व व्यापा-यांना मोठा आर्थिक  लाभ झाला.
संपूर्ण देशभर जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आल्याने गत तीन ते चार महिने आपण पुन्हा या सर्वांची भेट घेऊन बेदाण्यावर कर नको, अशी विनंती केली.  बेदाण्याला ड्रायफ्रूट या वर्गवारीतून वगळून कृषी उत्पादन या वर्गवारीत समाविष्ट करावे, अशी मागणी केली. आपल्या प्रयत्नांना थोडे का होईना यश आले व  बेदाण्यावरील जीएसटी 12 टक्क्यावरून पाच टक्के इतका करण्यात आला. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील बेदाणा व्यापा-यांना सुमारे 100 कोटी रूपयांचा फायदा  होणार असल्याचा दावाही संजय पाटील यांनी केला.