Breaking News

नगर जिल्ह्यात 1 लाख 60 हजार शेतक-यांना होणार कर्जमाफीचा फायदा ?

अहमदनगर, दि. 23 - राज्य सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला असून शेतकरी संपाचा एल्गार करणा-या नगर जिल्ह्यात सुमारे 1 लाख  60 हजार शेतक-यांना कर्जमाफीच्या या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच कर्जमाफीची ही रक्कम सुमारे साडे सहाशे कोटी इतकी असणार आहे.
नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथेच शेतक-यांनी कर्जमुक्तीसाठी आंदोलन पुकारले होते. त्यानंतर आंदोलनाचे हे लोण संपूर्ण राज्यभर पसरले. शेतकरी प्रथमच रस्त्यावर  उतरून आपला आक्रोश व्यक्त करीत असल्याने अखेरीस सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागली. सरकारने उच्चस्तरीय मंत्री गटाची नियुक्ती केल्यानंतर या मंत्री  गटाने शेतकरी सुकाणु समितीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील शेतक-यांचा विचार केला असता अडीच  एकर ते 5 एकर जमीन असणार्या शेतक-यांची संख्या 1 लाख 30 हजार आहे. या शेतक-यांना बँकेने 50 हजार ते दीड लाख रूपये या प्रमाणे एकूण 550 कोटी  रूपयांचे कर्ज दिलेले आहे. तसेच सुमारे 30 हजार शेतक-यांना बँकेने 100 कोटी रूपयांचे मध्यम मुदतीचे कर्ज दिले आहे. जिल्हा सहकारी बँकेने केलेल्या पीक कर्ज  वाटपाचा विचार केला तर जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार शेतक-यांचे तब्बल साडेसहाशे कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी  बँकेप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकानी देखील शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलेले आहे. जिल्हा सहकारी बँकेप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकानी दिलेल्या कर्जाचा देखील  कर्ममाफीत समावेश झाला तर आणखी सुमारे 1 ते दीड लाख शेतक-यांना कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो असे बोलले जात आहे. सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय  जाहीर झाला असला तरी अद्यापही अधिकृतपणे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांप्रमाणेच बँकांनाही कर्जमाफीचे नेमके निकष काय असतील  याबाबत मोठी उत्सुकता आहे.