Breaking News

‘विप्रो’ कंपनीला धमकीचा ईमेल; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

बंगळुरू, दि. 07 - ‘विप्रो’ या नामांकीत कंपनीला धमकीचा ई-मेल आला असल्याचे वृत्त आहे. या ई-मेलमध्ये 25 मे पर्यंत 500 कोटी रुपये न दिल्यास ड्रोनच्या  माध्यमातून विप्रोच्या उपहारगृहात ‘रायसीन’ नावाचा विषारी पदार्थ सोडला जाईल. मेलमध्ये दिलेल्या पद्धतीने पैसे लवकरात लवकर पाठवावे, असे नमूद  करण्यात आले होते.
आमच्याकडे एक किलो ‘रायसीन’ उपलब्ध आहे, असे ई-मेल पाठवणा-याकडून सांगण्यात आले आहे. हे पटवून देण्यासाठी 2 ग्रॅम ‘रायसीन’ विप्रोच्या  कार्यालयात एका लिफाफ्याद्वारे पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आम्हाला मेल आला तेव्हा आम्ही याबाबत पोलिसांना लिखित स्वरुपात कळवले. त्यानंतर ‘विप्रो’च्या कार्यलायाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली  आहे, असे विप्रोच्या व्यावसायिक क्षेत्राच्या प्रमुख पौर्णिमा यांनी सांगितले. तर, ‘विप्रो’कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात तपास सुरू करण्यात  आला आहे, असे बंगळुरू गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त एस. रवी यांनी सांगितले.